रंगरंगोटीचे काम करणाऱ्या कारागिरांना सुगीचे दिवस
By Admin | Updated: October 14, 2016 01:53 IST2016-10-14T01:53:36+5:302016-10-14T01:53:36+5:30
विजयादशमी समाप्त होताच दिवाळीसाठी घरांची रंगरंगोटी करण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे.

रंगरंगोटीचे काम करणाऱ्या कारागिरांना सुगीचे दिवस
रोजगार उपलब्ध : दिवाळीसाठी घरांच्या रंगाईचे काम जोरात
गडचिरोली : विजयादशमी समाप्त होताच दिवाळीसाठी घरांची रंगरंगोटी करण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. त्यामुळे घर रंग काम करणाऱ्या कारागीर, कंत्राटदार यांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. शहरातील लहान घरांपासून तर मोठ्या बिल्डिंगपर्यंत रंगरंगोटी करण्याचे काम अनेक नागरिक दिवाळीच्या पूर्वी सुरू करतात. सध्या गडचिरोलीसह ग्रामीण भागात घरांच्या रंगरंगोटीचे काम सुरू झाले आहे.
शहरातील मोठ्या हार्डवेअर विक्रेत्यांनी विविध कंपन्यांचे रंगही उपलब्ध करून दिले आहे. घर व बिल्डिंगच्या रंगाचे आता विविध कलर बाजारात उपलब्ध झाले असून त्याचे कम्प्युटरवर ग्राफिक्स तयार करून अनेक नागरिक दुकानातून रंग तयार घेत आहे. त्यानुसार रंगाचे नंबर सांगून ते रंग सिलेक्ट केले जातात. मोठ्या बिल्डिंगच्या रंग कामासाठी कंत्राटदारही सज्ज झाले आहे.
मोठ्या सिड्या तसेच दोर बांधून त्यावर मजूर दिवसभर रंगकाम करीत असतात. पूर्वी ब्रशच्या सहाय्याने रंगकाम केले जायचे. आता मात्र ब्रशची जागा नवीन साधनांनी घेतली असून त्याद्वारे रंगाचे एक ते दोन हात मारले जात आहे. अनेक मोठ्या बिल्डिंगांना पुटिंग, पीओपी करण्याचे कामही हे कारागीर करतात. त्यांना वेगळा मोबदला द्यावा लागतो. मोठ्या बिल्डिंगचे काम लाख ते दीड लाख रूपयाला ठेका स्वरूपात घेतल्या जाते व ते मुदतीच्या आत पूर्ण करून दिल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यात या कामावर जवळजवळ हजार मजूर सध्या कार्यरत आहे. रंगाचेही विविध प्रकार बाजारात आले असून सध्या घराला प्लास्टिक कोटेड रंग देण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. हा रंग साधारणत: पाच ते सात वर्ष टिकतो. त्याला दरवर्षी धुता येते. त्यामुळे हे कारागीर एकदा हा रंग मारून दिल्यानंतर पुन्हा आपला मोर्चा नवीन घरांकडे वळवित आहे. दिवाळीपर्यंत तरी आगामी पंधरा दिवस या कंत्राटदार व मजुरांना संध्या सुगीचे दिवस आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात बाहेर राज्यातूनही या कामासाठी कारागीर आले असून अनेक नागरिक आता एकाच खोलीला विविध शेडचे रंगही देतात, अशी माहिती कारागीर ब्रिजेश यादव यांनी लोकमतशी बोलताना दिली. आगामी १५ दिवस हे काम चालेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)