वघाळा गावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन
By Admin | Updated: May 16, 2017 00:44 IST2017-05-16T00:44:10+5:302017-05-16T00:44:10+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विदेशी स्थलांतरीत पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

वघाळा गावात विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन
संरक्षणासाठी गावकरी सज्ज : पक्षीपे्रमींच्या भेटी वाढल्या
महेंद्र रामटेके । लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात पक्ष्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही विदेशी स्थलांतरीत पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. मागील ४० वर्षांपासून वघाळा येथे आगमन होण्याची परंपरा पक्ष्यांनी यावर्षीही कायम ठेवली आहे. विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. पाहुण्या पक्ष्यांच्या स्वागत, संवर्धन व संरक्षणासाठी वघाळावासीय सज्ज झाले आहेत. गावातील वन्यजीव पक्षी संरक्षण समितीने पाहुण्यांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत.
साधारणत: वघाळा येथे एप्रिल ते मे महिन्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन होते व हे पक्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात निघून जातात. वघाळा गावात सुमारे ४७ चिंचेची मोठी झाडे आहेत. या झाडांवर विविध जातींचे विदेशी पक्षी वास्तव्य करतात. यावर्षी करपोचा ओपन बिल, स्टॉर्क, राईट आयबीस, पेंटेड स्टॉर्क, ब्लॅक कार्मोरन्ट, कॅटल, इविग्रेट, लिटल कार्मोरन्ट, कॅटल ईग्रेट, चेस्ट नट, बिटन अशा विविध जातींच्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. वघाळा येथे पक्षांसाठी पोषक वातावरण आहे. नदीमध्ये मिळणारे खाद्य, पाणी व वघाळावासीयांकडून मिळणारे विशेष संरक्षण यामुळे वघाळा हे गाव विदेशी पक्ष्यांसाठी पोषक ठरले आहे. दरवर्षी पक्ष्यांची संख्या वाढत आहे. विदर्भात सर्वात जास्त स्थलांतरीत विदेशी पक्षी वघाळा येथे येतात. त्यामुळे या गावात पक्षी पाहण्यासाठी व त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक वन्यजीवप्रेमी येतात. या गावाला पक्षी पर्यटन स्थळ शासनाने घोषीत करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. पक्ष्यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी शासनाकडून अपुरा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी वन्यजीव संरक्षण समितीचे अध्यक्ष रामदास दोनाडकर, संदीप प्रधान, धनराज दोनाडकर, रामकृष्ण धोटे यांनी केली आहे.
पिलांचा जन्म वघाळातच
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विदेशी पक्षी पाहुणे वघाळा येथे थांबतात. या कालावधी प्रजनन होऊन लहान पिलांचे पालन पोषण वघाळा येथेच होते. पिले उडण्यास सक्षम होईपर्यंत म्हणजे, जवळपास डिसेंबरपर्यंत सदर पक्षी वघाळा येथेच थांबतात. त्यामुळे अनेक पक्षांचे वघाळा हे जन्मस्थळ बनले आहे.