नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By Admin | Updated: May 14, 2017 01:46 IST2017-05-14T01:46:32+5:302017-05-14T01:46:32+5:30

रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.

Arrange the cannibalistic tiger | नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

आरमोरीत पत्रकार परिषद : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची आमदारांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : रवी येथील शेतकरी वामन दशरथ मरापे यांच्यावर सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतावर वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. त्यामुळे या परिसरातील कोंढाळा, अरसोडा येथील शेतकरी धास्तावले आहेत. वन विभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी शनिवारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दीड महिन्यापूर्वी कोंढाळा येथील एका इसमावर याच नरभक्षक वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. सदर इसम मोहफूल गोळा करण्याकरिता गेला होता. त्याच्यावर वाघाने अचानक हल्ला केला होता. त्याचीच पुनरावृत्ती शनिवारी घडली. वाघाने वामन मरापे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. सध्या उन्हाळी धानपीक व अन्य भाजीपाला पीक तालुका परिसरात लावण्यात आले आहेत. परंतु नरभक्ष्यक वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. शेतावर जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी देसाईगंजचे उपवनसंरक्षक विवेक हौशिंग तसेच मुख्य वनसंरक्षक एडबाँड यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी दिली.
नरभक्ष्यक वाघाच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजूर ठार झाल्यास त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी मिळावी, यासाठी आपण विधानसभेत मागणी करणार असल्याचे आ. कृष्णा गजबे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, युवा मोर्चाचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, स्वप्नील धात्रक, सचिन बेहरे, युगल सामृतवार, गोलू वाघरे व कार्यकर्ते हजर होते. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वनही केले.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी चर्चा
कोंढाळा व रवी जंगल परिसरातील नरभक्ष्यक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आरमोरी येथील काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांच्याकडे शनिवारी चर्चेदरम्यान केली. माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी व कार्यकर्त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तांबटकर यांची भेट घेऊन नरभक्ष्यक वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत चर्चा केली. वनविभागाचे दुर्लक्ष व लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजीपणामुळे सदर घटना घडली, अशी टीकाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला वाघाने भक्ष्य बनविले होते. शनिवारी पुन्हा आरमोरी तालुक्यातील रवी येथे आपल्या शेतात सकाळच्या सुमारास धानपिकाला पाणी देत असताना वामन मरापे या शेतकऱ्यावर वाघाने अचानक हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्यामुळे या भागातील शेतकरी दहशतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी धानाची लागवड केलेली आहे. सध्या धानपीक जोमात असून दररोज शेतकऱ्यांना शेतावर जावे लागते. वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे वनविभागाने या नरभक्ष्यक वाघाचा तत्काळ बंदोबस्त करून मरापे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम, डॉ. रामकृष्ण मडावी, सुभाष सपाटे यांनी केली आहे. दरम्यान आनंदराव गेडाम यांनी उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच पदाधिकाऱ्यांनी पीडित मरापे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आ. गेडाम यांच्या समवेत जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, अशोक भोयर हजर होते.

 

Web Title: Arrange the cannibalistic tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.