आरमोरी, गडचिरोलीचे राजकीय महत्त्व झाले कमी
By Admin | Updated: November 25, 2014 22:54 IST2014-11-25T22:54:40+5:302014-11-25T22:54:40+5:30
विधानसभा निवडणुकीने गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर व्यापक परिणाम केला आहे. पूर्वी राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेले गडचिरोली व आरमोरी या दोनही गावांचा राजकीयदृष्ट्या

आरमोरी, गडचिरोलीचे राजकीय महत्त्व झाले कमी
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीने गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणावर व्यापक परिणाम केला आहे. पूर्वी राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेले गडचिरोली व आरमोरी या दोनही गावांचा राजकीयदृष्ट्या महत्त्व कमी होऊन चामोर्शी व देसाईगंज या गावांचा महत्त्व वाढले आहे.
गडचिरोली विधानसभा मतदार संघातून यावेळी निवडून आलेले डॉ. देवराव होळी हे सध्या चामोर्शीचे रहिवासी आहे. चामोर्शी गावात त्यांचे दुमजली घर आहे. त्यामुळे चामोर्शी गावाचे राजकीय महत्त्व आमदार मिळाल्यामुळे वाढले आहे. निवडणूक आटोपून महिना, दोन महिने होत आले. परंतु अद्याप त्यांनी गडचिरोली शहरात संपर्क कार्यालयही उघडलेले नाही. विविध शासकीय अधिकाऱ्यांना तसेच त्यांच्याकडे काम असणाऱ्या नागरिकांना चामोर्शी येथे हजेरी लावावी लागत आहे. यापूर्वी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून विशेषत: गडचिरोलीत वास्तव्याला असलेलेच लोकप्रतिनिधी निवडून आलेत. त्यांचे गडचिरोली हेच मुख्यालय होते. १५ वर्ष आमदार राहिलेले मारोतराव कोवासे यांचे गडचिरोली शहरातच घर होते. हिरामन वरखडे धानोरा तालुक्यात राहणारे होते. अशोक नेतेही गडचिरोली मुख्यालयातलेच असल्याने लोकांना त्यांचा कायम संपर्क होता. डॉ. उसेंडी यांचेही मुख्यालय गडचिरोलीचे होते. पहिल्यांदाच असा प्रकार झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीचे राजकीय महत्त्व कमी झाल्याची भावना जनमाणसामध्ये दिसत आहे. अशीच परिस्थिती आरमोरी विधानसभा क्षेत्राचीही आहे. आरमोरी गाव सहकार क्षेत्राचेही मुख्यालय होते. आरमोरीवरून जिल्ह्याचे राजकारण चालते, असे अनेक लोक म्हणत. परंतु यावर्षीच्या निवडणुकीने आरमोरीच्या राजकीय मोठेपणाला ग्रहण लावले आहे. या मतदार संघातून यावेळी देसाईगंज तालुक्याचा रहिवासी असलेला व्यक्ती आमदार म्हणून निवडून आला आहे. आरमोरीचा आमदार म्हणजे, आरमोरी मुख्यालयातला हा पायंडा मोडीत निघाला आहे. बाबुरावजी मडावी हे देसाईगंज तालुक्यातील रहिवासी असताना आमदार झाले होते. त्यानंतर मात्र या मतदार संघात हरिराम वरखडे, डॉ. रामकृष्ण मडावी, आनंदराव गंगाराम गेडाम हे सारे लोकप्रतिनिधी आरमोरीचे रहिवासी होते. आरमोरीवरूनच त्यांचा कारभार चालायचा. यावेळी मात्र क्रिष्णा गजबे भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. ते देसाईगंज तालुक्यातील पोटगावचे रहिवासी आहे. त्यांच्या विजयामुळे देसाईगंजचे राजकीय वर्चस्व वाढले आहे. देसाईगंज शहरात त्यांनी आता संपर्क कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न चालविला आहे. आरमोरी भागातील जनतेला आपले प्रश्न घेऊन आता देसाईगंज गाठावे लागणार आहे. पूर्वी मागील १० वर्ष आरमोरीचा वाडा आमदाराच्या सत्तेचे केंद्र होता. केंद्रातील राजकीय मुसद्दी भाजपात असले तरी आमदार मात्र त्यांच्यापासून १६ किमी अंतरावर राहणार आहे. त्यामुळे आरमोरीचा राजकीय वजन आता जुन्यासारखे राहणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.
अहेरी विधानसभा मतदार संघ मात्र याला अपवाद राहिले आहे. अहेरीतून आमदार होणारे बहुतांशी लोकप्रतिनिधी हे अहेरी गावातील असतात. यंदा फक्त जागा बदलली आहे. रूख्मीणी महल सत्तेचे निर्णय केंद्र झाले आहे. तसेच यापूर्वी आमदारांवर राहणारे रिमोंट कंट्रोलही आता दुसऱ्या व्यक्तींच्या हातात गेले आहे, अशी चर्चा जनमाणसात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)