आरमोरी पं. स. वर सभापती कुणाचा?

By Admin | Updated: March 4, 2017 01:13 IST2017-03-04T01:13:25+5:302017-03-04T01:13:25+5:30

नुकत्याच पार पडलेल्या पं. स. निवडणुकीत आरमोरी पंचायत समितीच्या एकूण ८ जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४,

Armori Pt. C. Who is the chairmanship over? | आरमोरी पं. स. वर सभापती कुणाचा?

आरमोरी पं. स. वर सभापती कुणाचा?

काँग्रेस की भाजपचा? : सत्तेसाठी शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका निर्णायक ठरणार
महेंद्रकुमार रामटेके  आरमोरी
नुकत्याच पार पडलेल्या पं. स. निवडणुकीत आरमोरी पंचायत समितीच्या एकूण ८ जागांपैकी काँग्रेस पक्षाने ४, भाजपने ३ व शिवसेनेने १ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आरमोरी पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सभापती कुणाचा होणार याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेच्या एका सदस्याची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
आरमोरी पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झालेले आहे. काँग्रेसकडे सिर्सी पं. स. गणातून निवडून आलेल्या बबीता उसेंडी या एकमेव दावेदार आहेत. तर भाजपाकडे इंजेवारी पं. स. गणातून निवडून आलेल्या रूपमाला वट्टी या एकमेव दावेदार आहेत. आरमोरी पंचायत समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पं. स. निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत नाही. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला एका सदस्याची गरज भासत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच आरमोरी तालुक्यात सुद्धा पंचायत समितीवर आपला झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेससह भाजपनेही कंबर कसली आहे. आरमोरी पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी ५ सदस्यांची गरज आहे. काँग्रेसकडे ४ सदस्य संख्या असली तरी त्यांना शिवसेनेच्या एका सदस्याची गरज आहे. पंचायत समितीमध्ये काँग्रेस व शिवसेनेची युती झाली तर काँग्रेसचा सभापती व शिवसेनेचा उपसभापती बनू शकतो. भाजपचे पं. स. चे तीन सदस्य निवडून आले आहेत. शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तरी त्यांची संख्या ४ वर पोहोचेल. तरी सुद्धा भाजपकडे सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत होत नाही. जर सेनेने भाजपला पाठिंबा देऊ केला तर भाजपचे ४ व काँग्रेसचे ४ असे सारखेच गणित जुळते आणि असे झाले तरी ईश्वरचिठ्ठीशिवाय पर्याय उरणार नाही.
१० वर्षांपूर्वी आरमोरी पं. स. मध्ये सत्ता स्थापनेच्या वेळी जेव्हा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ईश्वरचिठ्ठीत काँग्रेसचे बगुजी ताडाम हे आरमोरी पं. स. चे सभापती झाले होते. काँग्रेस आणि भाजपला एका सदस्याची गरज असल्याने सत्ता स्थापनेत शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार असून शिवसेना सध्या तरी किंगमेकरच्या भूमिकेत आहे. आरमोरी पं. स. च्या २० व्या सभापती पदाच्या निवडीचे काँग्रेस आणि भाजपलाही वेध लागले आहे. आरमोरीत पं. स. वर आपली सत्ता टिकवून ठेवायची आहे. तर भाजपला सेनेच्या मदतीने आपला झेंडा फडकवायचा आहे.
सध्यास्थितीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस दावेदार ठरू शकते. शिवसेना जर काँग्रेससोबत गेली तर काँग्रेसच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शिवसेनेचे सदस्य यशवंत सुरपाम यांच्याभोवती सध्या निर्णय फिरत आहे.

Web Title: Armori Pt. C. Who is the chairmanship over?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.