आरमोरी नगर पंचायतीचे भिजत घोंगडे कायमच
By Admin | Updated: January 30, 2017 03:36 IST2017-01-30T03:36:31+5:302017-01-30T03:36:31+5:30
शासनाच्या निर्णयानुसार दीड वर्षापूर्वी आरमोरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यानंतर आरमोरी

आरमोरी नगर पंचायतीचे भिजत घोंगडे कायमच
विकासकामांना बसली खीळ : नगर पंचायत की नगर परिषद? निर्मितीचा चेंडू कोर्टात
महेंद्र रामटेके ल्ल आरमोरी
शासनाच्या निर्णयानुसार दीड वर्षापूर्वी आरमोरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यानंतर आरमोरी येथील जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन असे तीन क्षेत्र गोठविण्यात आले. ऐन नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आरमोरी शहरातील काही राजकीय मंडळींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून नगर पंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती आणली. तेव्हापासून आरमोरी नगर परिषद होणार की नगर पंचायत राहणार याबाबतचा चेंडू कोर्टात लटकलेला आहे. नगर पंचायतीची निवडणूक न झाल्याने आरमोरी नगर पंचायतीची विकास कामे ठप्प झाली असून ही नगर पंचायत सध्या वांझोटी झाली आहे.
एक तर नगर पंचायतीची निवडणूक नाही आणि दुसरीकडे जि.प.चे एक व पं.स.चे दोन क्षेत्र गोठविण्यात आले. मागील निवडणुकीच्या आठवणी ताज्या होऊन मतदान करता येणार नसल्याचे शल्य आरमोरीकरांच्या मनात बोचत आहे. शिवाय आरमोरी शहर हे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची खाण आहे. अशा स्थितीत स्थानिक नगर पंचायत क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या जि.प. क्षेत्रातून निवडणुका लढविता येत नसल्याचे दुखही पदाधिकाऱ्यांच्या मनात सतावत आहे.
आरमोरी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला तेव्हापासून शहरात विविध मूलभूत सुविधांचा डोंगर निर्माण झाला आहे. नगर पंचायतीची निवडणूक न झाल्यामुळे नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी तहसीलदारांकडे प्रशासकाचा कार्यभार सोपविण्यात आला.
पाच-सहा महिन्यापूर्वी नगर पंचायतीला मुख्याधिकारी देण्यात आला. मात्र शहर विकासासाठी नगर पंचायतीला येणारा निधी योग्य व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने विकास कामाला मोठ्या प्रमाणात खिळ बसली आहे. राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून आरमोरीची ओळख जिल्ह्यात सर्वत्र आहे.
आरमोरी नगर पंचायत होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आरमोरीकडे पाहिले जात होते. मात्र आरमोरी शहराच्या विकासासाठी असलेला जि.प. व पं.स. क्षेत्र गोठविण्यात आल्याने तसेच नगर पंचायत होऊनही निवडणूक न झाल्याने दुसऱ्या क्षेत्राच्या निवडणुका पाहणे तसेच चर्चा करण्यापलिकडे काहीच न करण्याची पाळी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांवर आली आहे. हे आरमोरीकरांचे दुदैवच म्हणावे लागेल. आरमोरी नगर परिषद निर्मितीमध्ये लोकसंख्येचा अडथळा निर्माण होत आहे.
नगरसेवकांअभावी जनता झाली पोरकी
४आरमोरी शहरात रस्ते, वीज, स्वच्छता व पाणी यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रशासकांना वेळ मिळत नाही व मुख्याधिकारी प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. निवडणुका झाल्या असत्या तर त्या-त्या प्रभागातील नगरसेवक आपल्या वार्डातील मूलभूत सुविधा मांडून त्या निकाली काढण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र वार्डातील समस्या कोणाला सांगाव्या, अशी स्थिती आरमोरीकरांची झाली आहे.