२५ कोटींच्या १३ कामांना मंजुरी

By Admin | Updated: December 21, 2015 01:22 IST2015-12-21T01:22:37+5:302015-12-21T01:22:37+5:30

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांच्या प्रशस्ती इमारतीअभावी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची कुचंबणा होत होती.

Approval of 13 works worth 25 crores | २५ कोटींच्या १३ कामांना मंजुरी

२५ कोटींच्या १३ कामांना मंजुरी

निधी मिळाला : आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारती होणार
दिलीप दहेलकर गडचिरोली
शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांच्या प्रशस्ती इमारतीअभावी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची कुचंबणा होत होती. ही बाब ओळखून गडचिरोली व भामरागड व अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांच्या इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. राज्य शासनाने २०१५-१६ या चालू वर्षात एकूण २५ कोटी रूपयांच्या आश्रमशाळा व वसतिगृहाच्या १३ कामांना मंजुरी प्रदान केली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आदिवासी विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. तसेच मुलांचे १३ व मुलींचे ८ असे एकूण २१ वसतिगृह आहेत. आश्रमशाळा व वसतिगृहांच्या इमारती सूसज्ज व प्रशस्त निर्माण झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. शिवाय त्यांची शिक्षणात गोडी निर्माण होऊन शिक्षणाचा दर्जाही उंचावेल. या सर्व दृष्टीने गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या वतीने दरवर्षी आश्रमशाळा व वसतिगृहांच्या नव्या इमारती बांधण्याचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून हाती घेण्यात आले आहे.
२०१५-१६ या वर्षात गडचिरोली प्रकल्पातील आश्रमशाळा व वसतिगृह इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय आश्रमशाळा गॅरापत्ती येथे मुलामुलींचे वसतिगृह, मसेली आश्रमशाळेत मुलामुलींचे वसतिगृह, सोडे आश्रमशाळेतील मुलींचे वसतिगृह, कारवाफा आश्रमशाळेतील मुलांचे वसतिगृह, कुरंडीमाल आश्रमशाळेतील मुलांचे वसतिगृह, रेगडी आश्रमशाळेतील मुलांचे वसतिगृह, मार्र्कंडादेव येथील आश्रमशाळेची इमारत व वसतिगृह, येंगलखेडा आश्रमशाळेतील मुलामुलींचे वसतिगृह, अंगारा आश्रमशाळेच्या संकुलाच्या बांधकामाचा समावेश आहे. गडचिरोली प्रकल्पातील वसतिगृह व आश्रमशाळा इमारतीच्या नव्या ९ कामांसाठी प्रकल्प कार्यालयाला १५ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

भामरागड प्रकल्पातील तीन कामांना मान्यता
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत शासकीय मुलांचे वसतिगृह भामरागड येथील संरक्षण भिंतीचे बांधकाम, शासकीय मुलींचे वसतिगृह भामरागड येथील संरक्षण भिंत तसेच एटापल्ली येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे संरक्षण भिंत अशा तीन कामांना चालू आर्थिक वर्षात मान्यता देण्यात आली आहे. तर अहेरी प्रकल्प कार्यालयांतर्गत मुलचेरा येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीचे काम मंजूर करण्यात आले आहे. या चार कामांसाठी राज्य शासनाने १०५ लाखांचा निधी संबंधित प्रकल्प कार्यालयांना अदा केला आहे. या चारही कामांची निविदा प्रक्रिया सूरू करण्यात आली असून सदर कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

२० कोटींच्या चार वसतिगृह इमारतीचे कामे सुरू
गडचिरोली प्रकल्पांतर्गत गतवर्षी मंजुरी मिळालेल्या २० कोटी रूपये किमतीची चार वसतिगृहांच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहल्ली, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह चातगाव, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह देसाईगंज व धानोरा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या कामाचा समावेश आहे. जागेअभावी आष्टी येथील मुलींच्या वसतिगृहांचे काम सुरू होण्यास अडचण येत आहे. सध्या हे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत सुरू आहे.

तीन कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत
गडचिरोली प्रकल्पातील कोरची येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीचे बांधकाम केंद्रीय योजनेतून प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय पोटेगाव आश्रमशाळा इमारत व येंगलखेडा आश्रमशाळेची इमारत ही तीन कामे मंजुरीच्या प्रतीक्ष्ोत आहेत. सदर कामे मंजूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाचा पाठपुरावा सुरू आहे.

Web Title: Approval of 13 works worth 25 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.