बँक शाखेत लिपिकाची नियुक्ती करा
By Admin | Updated: October 24, 2015 01:15 IST2015-10-24T01:15:22+5:302015-10-24T01:15:22+5:30
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पोटेगाव येथे एक शाखा व्यवस्थापक कार्यरत असून एक परिचर आहे.

बँक शाखेत लिपिकाची नियुक्ती करा
पोटेगाव ग्रामसभेत ठराव पारित : ग्राहकांच्या गैरसोयीच्या मुद्यावर झाली चर्चा
पोटेगाव : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पोटेगाव येथे एक शाखा व्यवस्थापक कार्यरत असून एक परिचर आहे. पोटेगाव शाखेअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथे आलेल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी तासणतास थांबावे लागते. सदर मुद्दा पोटेगाव येथे १३ आॅक्टोबर रोजी सरपंच ओमकारेश्वर सडमाके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. त्यानंतर पोटेगावच्या बँक शाखेत एका लिपिकाची नियुक्ती करण्यात यावी, असा ठराव पारित करण्यात आला.
या ठरावाची प्रत गडचिरोली येथील बँकेच्या मुख्य शाखेला ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी सादर केली आहे. पोटेगाव बँक शाखेतील एका लिपिकाची यापूर्वी इतर शाखेत बदली करण्यात आली. तेव्हापासून या बँक शाखेचा कारभार एका व्यवस्थापकावर आहे. येथे दररोज ४० गावांतील हजारो खातेदार येऊन आर्थिक व्यवहार करतात. विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांची याच शाखेत खाते आहेत. पुरेशा कर्मचाऱ्याअभावी वयोवृद्ध निराधारांना कामासाठी दिवसभर बँक शाखेत राहावे लागते. त्यामुळे या ठिकाणी एका लिपिकाची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. या ग्रामसभेला ग्रा. पं. सदस्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)