शाळा प्रवेशासाठी अर्ज करा
By Admin | Updated: February 22, 2017 01:56 IST2017-02-22T01:56:27+5:302017-02-22T01:56:27+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षा अभियानांतर्गत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची योजना

शाळा प्रवेशासाठी अर्ज करा
शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन : २५ टक्के मोफत प्रवेश योजना
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षा अभियानांतर्गत आरटीई कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची योजना सन २०१७-१८ या शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. सदर प्रवेशासाठी पालकांनी आॅनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नानाजी आत्राम यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना आत्राम यांनी सांगितले की, २५ टक्के मोफत प्रवेश योजनेंतर्गत वंचित गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग मुलांना प्रवेश मिळणार आहे. वंचित गटातील मुले वगळून इतर संवर्गातील ज्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना या योजनेंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो. २५ फेब्रुवारीपर्यंत आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत असून आतापर्यंत १८८ अर्ज निश्चित झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. पत्र परिषदेला उपशिक्षणाधिकारी एम. एन. चलाख, दुर्गे, प्रफुल मेश्राम हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)