नक्षल सप्ताहाला कोरचीत पोलिसांच्या शांतता रॅलीने उत्तर
By Admin | Updated: December 7, 2015 05:40 IST2015-12-07T05:40:40+5:302015-12-07T05:40:40+5:30
नक्षल्यांनी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षल सप्ताह आयोजित केला आहे. या निमित्त कोरची तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण

नक्षल सप्ताहाला कोरचीत पोलिसांच्या शांतता रॅलीने उत्तर
कोरची : नक्षल्यांनी २ ते ८ डिसेंबर दरम्यान नक्षल सप्ताह आयोजित केला आहे. या निमित्त कोरची तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागामध्ये नक्षल पत्रके टाकून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कोरची पोलीस स्टेशनच्या वतीने कोरची शहरात शनिवारी शांतता रॅली काढली. या रॅलीत शाळा, महाविद्यालयांचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
नक्षल्यांच्या वतीने पीएलजीए सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहात मोठ्या घातपाताच्या कारवाया करण्याबरोबरच नक्षल विचार नागरिकांमध्ये रूजविण्यासाठी नक्षल्यांकडून प्रयत्न केले जातात. मात्र नक्षल्यांच्या या सप्ताहाला सडतोड उत्तर देण्यासाठी पोलीस विभागानेसुध्दा व्यूहरचना आखली आहे. या अंतर्गत कोरची पोलिसांच्या वतीने शहरातून शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वनश्री महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीत कोरची नगर पंचायतीचे उपाध्यक्ष कमल खंडेलवाल, पोलीस उपनिरिक्षक राखुंडे, दांडगे, रूखमोडे आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
दुर्गम व ग्रामीण भागातही जनजागृती कार्यक्रम
४नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताहामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. जंगलात नक्षल विरोधी अभियानही राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर दुर्गम व ग्रामीण भागामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन नक्षलवादाच्या विरोधात वातावरण तयार केले जात आहे.