सिरोंचाजवळ आणखी एक पूल
By Admin | Updated: November 18, 2015 01:43 IST2015-11-18T01:43:55+5:302015-11-18T01:43:55+5:30
प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर..

सिरोंचाजवळ आणखी एक पूल
तेलंगणाला जोडणारा तिसरा पूल : धर्मपुरी-रापनपल्ली गावादरम्यान पूल होणार
गडचिरोली : प्राणहिता नदीवर अहेरी-गुड्डेम पुलाचे बांधकाम करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असतानाच सिरोंचाजवळील धर्मपूरी गावाजवळून प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या कामाचे भूमीपूजन सोमवारी करण्यात आले आहे. या पुलांमुळे तेलंगणा व महाराष्ट्र यांच्यामधील नाते आणखी घट्ट होण्यास फार मोठी मदत होणार आहे.
तेलंगणा राज्य व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा प्राणहिता तसेच गोदावरी नदीने विभागले आहेत. सिरोंचा, अहेरी हे दोन तालुके प्राणहिता व गोदावरी नदीच्या काठालगत असल्याने या दोन्ही तालुक्यातील नागरिकांचे ऋणानुबंध तेलंगणा राज्यातील नागरिकांसोबत जोडले आहेत. मात्र महाराष्ट्र व तेलंगणा या दोनपैकी कोणतेच राज्य सरकार पूल बांधकामाबाबत पुढाकार घेत नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना आवागमन करताना फार मोठी अडचण जाणवत होती.
महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून गोदावरी नदीवर सिरोंचा-कालेश्वर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या पुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे. आठ दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन अहेरी (वांगेपल्ली)-गुडेम दरम्यान प्राणहिता नदीवर पूल बांधले जाईल. या पुलाच्या कामाचा शुभारंभ डिसेंबर महिन्यात करण्यात येईल. अशीही माहिती दिली होती. हे दोन पूल होण्याची शाश्वती असतानाच सिरोंचाजवळच धर्मपुरी, रापनपल्ली गावाच्या मध्यभागी सिरोंचापासून दोन किमी अंतरावर प्राणहिता नदीवर आणखी एक पूल बांधले जाणार आहे. या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सोमवारी पूल बांधणाऱ्या कंपनीचे कार्यकारी संचालक राजू यांच्या हस्ते करण्यात आला. या पुलाच्या बांधकामासाठी १२० कोटी रूपयांचा खर्च येणार असून हा सर्व खर्च तेलंगणा सरकार उचलणार आहे. या पुलाला २१ पिलर राहणार आहेत. वर्षभरात या पुलाचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती पूल बांधणाऱ्या कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. तेलंगणा राज्याला जोडणारा गडचिरोली जिल्ह्यातील हा तिसरा पूल होणार आहे. त्यामुळे गडचिरोलीवासीय व तेलंगणा राज्यातील नागरिक यांच्यातील नातेसंबंध, व्यवहार आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या इंद्रावती नदीवर पातागुडमजवळ पुलाचे काम सुरू आहे. या पुलामुळे छत्तीसगड व गडचिरोलीवासीय यांना आवागमनासाठी सुकर होणार आहे. विशेष म्हणजे सदर पूल राष्ट्रीय महामार्ग १६ जोडणार आहे. सदर मार्ग मुंबईवरून छत्तीसगडमधील जगदलपूरकडे निघते. राष्ट्रीय महामार्ग १६ चे काम बंद पडून आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे. नवीन भाजपा सरकार या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरूवात करेल, अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)