छत्तीसगड सीमेलगत आणखी एक नक्षली कॅम्प उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 19:54 IST2021-09-27T19:54:10+5:302021-09-27T19:54:50+5:30
Gadchiroli News भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेजवळील अबुजमाड भागातील जंगलात रविवारी संध्याकाळी नक्षली आणि पोलिसांत चकमक उडाली. त्यानंतर केलेल्या पाहणीत नक्षलींचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले.

छत्तीसगड सीमेलगत आणखी एक नक्षली कॅम्प उद्ध्वस्त
गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेजवळील अबुजमाड भागातील जंगलात रविवारी संध्याकाळी नक्षली आणि पोलिसांत चकमक उडाली. त्यानंतर केलेल्या पाहणीत नक्षलींचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. सोमवारी त्या ठिकाणी असलेली स्फोटके (आयईडी) जागेवरच नष्ट करण्यात आली. (Another Naxal camp near Chhattisgarh border destroyed)
गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांना घातपाती कारवाया करण्यात यश आलेले नाही. मात्र अबुजमाडचा परिसर नक्षल्यांचा गड मानला जात असल्यामुळे, त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण पाहून नक्षल्यांनी घातपाती कारवाया करण्यासाठी शिबिर लावले होते. कोठी पोलीस मदत केंद्रांतर्गत कोपर्शी व फुलनारच्या जंगलात हे शिबिर लावले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाचे जवान ऑपरेशनसाठी रवाना झाले.
रविवारी संध्याकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत कंपनी-१० आणि भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांच्या दिशेने गोळीबार करताच जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन नक्षल्यांचा पाठलाग केला. यादरम्यान तीनवेळा चकमक उडाली. चकमकीनंतर जंगल परिसरात शोध अभियान राबविले. त्या ठिकाणी आयईडी, नक्षल साहित्य सापडले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, समीर शेख, अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले, सी-६० प्राणहिताचे अधिकारी योगीराज जाधव आदींनी परिश्रम घेतले.