संजय तिपाले, गडचिरोली : आरमोरी क्षेत्राचे सलग दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करुन ७ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला.
डॉ. मडावी हे १९९५ मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेत पोहोचले. १९९९ मध्येही त्यांनी विधानसभा गाठली. २००४ मध्ये त्यांचा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पराभव झाला. दरम्यान, शिवसेना दुभंगल्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ दिली होती.२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती, पण त्यांनी निवडणूक न लढविता उध्दवसेनेतच राहणे पसंद केले होते. अलीकडेच पक्षाने त्यांना जिल्हा समन्वयकपदाची जबाबदारी दिली होती. पक्षात दुय्यम पद दिल्याची सल त्यांना होती, यातून त्यांनी उध्दवसेनेसोबतचे नाते तोडून राष्ट्रवादीसोबत नवा प्रवास सुरु केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुंबईत झाला प्रवेश सोहळाउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात डॉ. मडावी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.आमदार धर्मरावबाबा आत्राम, शिवाजीराव गर्जे, राजू नवघरे, मनोज कायंदे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण , जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी उपस्थित होते.