भांडून मिळवावी लागली रूग्णवाहिका
By Admin | Updated: December 25, 2014 23:31 IST2014-12-25T23:31:47+5:302014-12-25T23:31:47+5:30
महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. या तालुक्यासाठी शासनाकडून टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध

भांडून मिळवावी लागली रूग्णवाहिका
सिरोंचातील प्रकार : अनेक महिन्यांपासून १०८ क्रमांकाची टोल फ्री रूग्णसेवा बंदच
सिरोंचा : महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयात आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे. या तालुक्यासाठी शासनाकडून टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात न आल्याने गंभीर स्वरूपाच्या रूग्णांना पुढील उपचारासाठी नेण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गुरूवारी नागरिकांना आरोग्य यंत्रणेच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांशी भांडून बाळंत महिलेला अहेरी येथे नेण्यासाठी रूग्णवाहिका मिळवावी लागल्याचा प्रकार येथे घडला.
गुरूवारला आसरअल्ली येथील गगुरी बनय्या ही महिला प्रसुतीसाठी आसरअल्लीवरून सिरोंचा येथे दाखल झाली. या महिलेची प्रसुती करण्यात आली. तिला दोन जुळे अपत्य झाले. आसरअल्ली येथून सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालयात आल्यावरही सदर बाळंत महिलेला आरोग्य सुविधा मिळाल्या नाही. सिरोंचा रूग्णालयात बाळाला ठेवायसाठी लागणारे आरोग्य उपकरण नसल्याने सिरोंचा रूग्णालयात नसल्याने या गरीब महिलेला दवाखाण्याबाहेर करून देण्यात आले व आपण अहेरी ग्रामीण रूग्णालयात जावे, असा सल्ला दिला. आसरअल्लीवरून पदरचे पैसे खर्च करून सिरोंचापर्यंत आलेल्या या महिलेजवळ पुढच्या प्रवासासाठी एकही पैसा नव्हता. सिरोंचा तालुक्यात राज्य सरकारची १०८ टोल फ्री सेवेची रूग्णवाहिका उपलब्ध नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून ही रूग्णवाहिका लोकांना सेवा देत नाही. अशा परिस्थितीत दोन जुळ्या मुलांना घेऊन दवाखाण्याच्या परिसरात बसण्यापलीकडे या महिलेजवळ दुसरा पर्याय नव्हता. अखेरीस सिरोंचा येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी ५००-५०० रूपये वर्गणीकरून ७ हजार रूपये जुळवून दिले व अहेरीपर्यंतची रूग्णवाहिका आरोग्य विभागाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांशी भांडून त्यांना मिळवून घ्यावी लागली. अधिकारी मानायला तयार नव्हते. अखेरीस कसेतरी करून त्यांनी या महिलेसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली. परंतु हा नेहमीचाच त्रास असल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक आरोग्यसेवेमुळे त्रस्त झाले आहे. शासन आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाचे अनेक दावे करीत असले तरी तालुक्यात मात्र कोणतीही आरोग्य सेवा येथे उपलब्ध नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.