विदर्भवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निवेदनांचा वर्षाव
By Admin | Updated: November 26, 2014 23:06 IST2014-11-26T23:06:26+5:302014-11-26T23:06:26+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय

विदर्भवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निवेदनांचा वर्षाव
गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या विषयावर शेकडो निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानीही चर्चेचा विषय ठरला.
भारतीय जनता पक्ष छोट्या राज्याच्या निर्मितीचे समर्थन करणार आहे. यापूर्वीही भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य केले, असे ठोस आश्वासन जनतेला दिले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजप विदर्भ राज्याच्या निर्मितीपासून फारकत घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री आले असताना या जिल्ह्यातील तमाम विदर्भवादी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलीत. यात स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच अहेरी हा स्वतंत्र जिल्हाही निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत लोकसभा निवडणुकीतच आघाडी केली. भाजपच्या तिकीटावर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज आमदार म्हणून निवडून आलेत. महाराष्ट्र राज्यात गडचिरोलीच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र विदर्भ झाल्यास आपल्या भागाला न्याय मिळेल, अशी येथील जनतेची धारणा आहे. त्यामुळेच विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांवर निवेदनाचा पाऊस पाडला.
अखेरीस मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. विभाजन करून राज्य निर्मिती होत नाही. तर स्वतंत्र राज्य निर्माण करावे लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना गडचिरोलीत म्हणाले. विदर्भ राज्य निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी दिला. एकूणच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानेच चर्चेत राहिला. (जिल्हा प्रतिनिधी)