जिल्हा बँकेची मतदार यादी जाहीर

By Admin | Updated: March 20, 2015 01:22 IST2015-03-20T01:22:00+5:302015-03-20T01:22:00+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता असून संचालकांच्या निवडीसाठी मतदान करणाऱ्या ...

Announcement of voter list of District Bank | जिल्हा बँकेची मतदार यादी जाहीर

जिल्हा बँकेची मतदार यादी जाहीर

गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या शेवटी होण्याची शक्यता असून संचालकांच्या निवडीसाठी मतदान करणाऱ्या ३०७ मतदारांची अंतिम यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आली आहे.
सहकार क्षेत्रातील सर्वच संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या बँकेला जिल्ह्याच्या विकासात विशेष महत्त्व आहे. जिल्हा बँकेचा कारभार चालविण्यासाठी २१ संचालकांची निवड केल्या जाते. या संचालकांची निवड विविध गटांच्या माध्यमातून करण्यात येते.
‘अ’ गटातून ९ संचालक निवडले जाणार आहेत. या गटामध्ये आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व सेवा सहकारी संस्था यांचा समावेश आहे. या संस्थांचे कुरखेडा-कोरची, चामोर्शी-मुलचेरा, एटापल्ली-भामरागड व उर्वरित सहा तालुक्यांचा प्रत्येकी एक गट असे नऊ गट पाडण्यात आले असून या गटातून प्रत्येकी एका संचालकाची निवड केली जाणार आहे.
पाच जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन जागा महिलांसाठी, एक जागा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, एक जागा विमुक्त भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग तसेच एक जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. राखीव संचालकांना सर्वच मतदार मतदान करणार आहेत.
‘ब’ गटात शेतमाल प्रक्रिया संस्था, ‘क’ गटात कृषी पणन संस्था, ‘ड’ गटात वैयक्तिक भागधारक व इतर गैरसहकारी संस्थांचे सभासद, ‘इ’ गटात नागरी पथसंस्था, मच्छीमार संस्था, जंगल कामगार संस्था यांचा समावेश आहे. ‘फ’ गटात मजूर, दुग्ध, औद्योगिक संस्था, ‘ग’ गटात नागरी सहकारी बँक व ‘य’ गटात इतर सर्व सहकारी संस्थांचा समावेश आहे. या गटांमधून प्रत्येकी एका संचालकाची निवड केली जाणार आहे.
अंतिम यादी जाहीर झाल्याने जिल्ह्यातील निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरू झाली असून मोर्चेबांधणी केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Announcement of voter list of District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.