सत्कार रद्द झाल्याने वर्धापन दिन कार्यक्रमाची उपस्थिती रोडावली
By Admin | Updated: October 3, 2015 01:17 IST2015-10-03T01:17:19+5:302015-10-03T01:17:19+5:30
गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन कार्यक्रम शुक्रवारी गडचिरोली येथे पार पडला.

सत्कार रद्द झाल्याने वर्धापन दिन कार्यक्रमाची उपस्थिती रोडावली
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन कार्यक्रम शुक्रवारी गडचिरोली येथे पार पडला. विद्यापीठाच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार या कार्यक्रमात आदर्श समाजभुषण पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, आदर्श अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला राज्याचे वजनदार मंत्री हजर असूनही सभागृहातील उपस्थिती रोडावलेलीच होती.
२०११ मध्ये चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ निर्माण करण्यात आले. त्याला २ आॅक्टोबर रोजी चार वर्ष पूर्ण झाले. यावर्षी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूही डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांच्या रूपाने मिळाला व यावर्षीच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. विद्यापीठाने या कार्यक्रमात पुरस्कार वितरणाचाही बेत आखला होता. मात्र ऐनवेळी हा पुरस्कार वितरण समारंभ बुधवारी रद्द करण्यात आला. कुणाची पुरस्कारासाठी निवड करायची यावर विद्यापीठ व्यवस्थापन व प्रशासन यांच्यात एकमत न झाल्याने बुधवारी हा सोहळा स्थगित करण्यात आल्याची माहिती अंतर्गत गोट्यात देण्यात आली. मात्र याची प्रसारमाध्यमांना माहिती दिली नाही. शुक्रवारच्या कार्यक्रमात आदर्श विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कारच होणार नसल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी विद्यापीठाच्या या कार्यक्रमाकडे पूर्णत: पाठ फिरविली. विद्यापीठाने टाकलेला शानदार शामीयाना अर्धवटच भरलेला होता. याप्रसंगी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तर आमदार क्रिष्णा गजबे, माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात खासदार अशोक नेते म्हणाले, नामदार सुधीर मुनगंटीवार हेच गोंडवाना विद्यापीठाचे खरे शिल्पकार, प्रणेते व निर्माते आहेत. गोंडवाना विद्यापीठ निर्मितीसाठी चार जिल्ह्याची समिती गठीत करण्यात आली होती. नामदार मुनगंटीवार हे गोंडवाना विद्यापीठ निर्मितीसाठी विशेष आग्रही होते. त्यांनी तत्कालीन उच्चतंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच गडचिरोलीत विद्यापीठ उभे राहू शकले, असे खासदार नेते म्हणाले. मुनगंटीवार यांना गडचिरोली जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यात येऊन नियोजन व विकास समितीची बैठक घेतली. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी नामदार मुनगंटीवार हे जिल्ह्यातील खासदार, आमदाराइतकेच आग्रही व कर्तव्यदक्ष आहे, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)