अहेरीच्या घटनाक्रमावर संघ परिवारातून नाराजी

By Admin | Updated: December 1, 2015 05:43 IST2015-12-01T05:43:48+5:302015-12-01T05:43:48+5:30

अहेरी नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर संघ परिवारासह भाजपातही

Anhari's eventual annoyance by the Sangh family | अहेरीच्या घटनाक्रमावर संघ परिवारातून नाराजी

अहेरीच्या घटनाक्रमावर संघ परिवारातून नाराजी

नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बदलला : पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
गडचिरोली : अहेरी नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर संघ परिवारासह भाजपातही आनंदाचे वातावरण होते. पालकमंत्र्यांमुळे हे घवघवीत यश मिळाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर संघ परिवारातूनच नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराचे नाव सुचविण्यात आले. त्याला सर्वानुमते दुजोरा देण्यात आला. मात्र ऐन मतदानाच्या तोंडावर संघाने सुचविलेला उमेदवार डावलून ऐनवेळी नाविसच्या उमेदवाराला राजपरिवारातून पुढे करण्यात आल्याने भाजपाचा संघ परिवार कमालीचा नाराज झाला आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका भविष्यात पालकमंत्र्यांना बसण्याची दाट शक्यता भाजपच्या मातृ संघटनातून व्यक्त केली जात आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात जनसंघाच्या काळापासून अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तारासाठी काम केले. जनसंघाच्या काळापासून काम करणारे अनेक लोक अहेरी, सिरोंचा, भामरागड, आलापल्ली भागात आहेत. याशिवाय अहेरीत पूर्वीच्या काळी विश्वहिंदू परिषद, बजरंग दलात काँग्रेससह अनेक पक्षाचे लोक हिंदूत्वाच्या मुद्याखाली काम करीत होते. हा इतिहास सर्वश्रूत आहे. ठाकरे परिवाराचाही अशाच सदस्यांमध्ये समावेश होतो. यावेळी अहेरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत हर्षा ठाकरे भाजपकडून निवडून आल्या. त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य संघात वरिष्ठ पदावर विदर्भात काम करतात. त्यामुळे संघाने ठाकरे यांना अहेरीच्या पहिल्या नगराध्यक्ष बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. संघाच्या आशीर्वादामुळे अम्ब्रीशराव आत्राम यांना पहिल्यांदा निवडून येऊनही राज्यमंत्री मंडळात संधी मिळाली. ही बाब भाजपचे वर्तुळही मान्य करते. त्यामुळे संघाने सुचविलेल्या उमेदवाराला ते नकार देणार नाहीत, अशी पक्की खात्री असलेल्या भाजपच्या मातृसंघटनातील सर्वांनी ठाकरे यांच्या नावावर एकमत करण्यासाठी प्रयत्न केलेत. स्पष्ट बहूमत असताना जिल्हाध्यक्षांना सूचना करून व्हिपही ठाकरे यांच्या नावाचा जारी करण्यात आला. मात्र दुसरीकडे नाविसचे सदस्य असलेल्या अहेरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन पेदापल्लीवार यांनी आपल्या पत्नी प्राजक्ता पेदापल्लीवार यांनाही नगराध्यक्ष बनविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. नाविस (भाजपकडून) नगराध्यक्ष पद न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेम्यातही जाण्याची तयारी त्यांनी केली होती, अशी छुपी चर्चा आता अहेरीत जोर धरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही या बाबीला ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदावर विराजमान होण्याकरिता पेदापल्लीवार आतूर होते. त्यामुळेच आम्ही आमचा उमेदवार मैदानात असतानाही पेदापल्लीवारांना समर्थन केले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहेरीतील ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे. मात्र आमचाही पेदापल्लीवारांनी विश्वासघात केला. अखेरीच नाविसचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांचे समर्थन केले, असा दावा राकाँने केला आहे. ऐनवेळी हा सर्व राजकीय तमाशा झाल्याने भाजपचा संघ परिवारही यावर प्रचंड नाराज आहे. ठाकरे परिवारातील सदस्याला डावलण्यात राजपरिवाराचाही मोठा वाटा असल्याची भावना संघ परिवारात व्यक्त केली जात आहे. हर्षा ठाकरे यांच्या रूपाने नवा चेहरा देण्याचा भाजपसह संघाचाही प्रयत्न होता. सचिन पेदापल्लीवार हे अहेरीचे उपसरपंच राहिले आहे. त्यांचा कार्यकाळ अहेरीकरांसाठी कधीही दिलासादायक नव्हता. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्या कुटुंबातीलच उमेदवाराला संधी देण्यात आल्याने जुनाच चेहरा राजपरिवाराने दिला, अशी भावना व्यक्त होत आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे म्हणाले की, सुरूवातीला हर्षा ठाकरे यांच्या नावाचा व्हीप जारी करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सर्व नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यावर उमेदवार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोणतीही गटबाजी नाही. एकमताने हा निर्णय झाला.

Web Title: Anhari's eventual annoyance by the Sangh family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.