संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय गाठले
By Admin | Updated: September 2, 2014 23:45 IST2014-09-02T23:45:03+5:302014-09-02T23:45:03+5:30
येथील बाजारात युरिया खत उपलब्ध नसल्याने खत खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली असता,

संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय गाठले
कुरखेडा : येथील बाजारात युरिया खत उपलब्ध नसल्याने खत खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली असता, या ठिकाणी खत उपलब्ध आढळून आले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट उपविभागीय कार्यालय गाठले व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी टोनगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कुरखेडा तालुक्यात मागील तीन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात युरिया खत टाकण्यासाठी लगबग सुरू केली. दरम्यान युरिया खत खरेदीसाठी बाजारपेठेत मंगळवारी गर्दी केली. मात्र बाजारपेठेत खत उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी डफ यांच्यासह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली. मात्र सदर गोदामसुद्धा रिकामेच दिसून आले. कुरखेडा तालुक्यात खरीप हंगामात १२०० मेट्रीक टन युरिया खताची आपूर्ती करण्यात आली. तर २४ आॅगस्ट रोजी २१९ मेट्रीक टन युरिया खताचा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती कृषी अधिकारी डफ यांनी शेतकऱ्यांना दिली. मात्र आठवडाभरातच विक्रेत्यांनी उपलब्ध खत मालाची इतरत्र विल्हेवाट लावून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली. बाजारपेठेतील खतविक्रेते तालुक्याबाहेर छत्तीसगड राज्यात व अन्य जिल्ह्यात अवैधरित्या खतविक्री करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे यावेळी केला.
या खतविक्रीच्या गोरख धंद्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रावण देशमुख, कुंवर लोकेंद्रशहा महाराज, माजी जि. प. सदस्य दिगांबर मानकर, रहेमान खॉ पठाण, मंगेश कोडाप, अस्लम खॉ आदींसह कुरखेडातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. खतविक्रेत्यांकडून कृत्रिम खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी भटकावे लागत असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.