संतप्त जमावाने स्वर्गरथ फोडला
By Admin | Updated: January 9, 2016 01:46 IST2016-01-09T01:46:11+5:302016-01-09T01:46:11+5:30
स्मशानघाटाकडे प्रेत नेण्यासाठी स्वर्गरथ न आणल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेमध्ये मृतदेह नेला.

संतप्त जमावाने स्वर्गरथ फोडला
वाहनाचे नुकसान : मृतदेह घेऊन नागरिक पालिकेत दाखल
गडचिरोली : स्मशानघाटाकडे प्रेत नेण्यासाठी स्वर्गरथ न आणल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेमध्ये मृतदेह नेला. त्याचबरोबर स्वर्गरथाची जाळपोळ केली. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
गोकुलनगर येथील बालू भानारकर (३८) या इसमाचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्याचा प्रेत कठाणी नदी घाटावर नेण्यासाठी त्याच्या नातेवाईकांनी नगर परिषदेमध्ये ३ वाजता फोन करून स्वर्गरथ ४ वाजता आरमोरी मार्गावरील इसाम्याजवळ ठेवण्यास सांगितले. त्यानुसार स्वर्गरथाचा चालक मुजाहिद वसीम पठाण याने स्वर्गरथ आरमोरी मार्गावरील इसाम्यावर नेऊन ठेवले. मात्र अर्धा ते पाऊण तास उलटूनही अंत्ययात्रा आरमोरी मार्गावरच्या इसाम्याजवळ पोहोचली नाही. त्यामुळे पठाणने स्वर्गरथ चामोर्शी मार्गावरच्या इसाम्याजवळ नेण्यास सुरूवात केली.
गोकुलनगरातील नागरिक चामोर्शी मार्गावर इसामा देतात. इसामा देऊन १५ मिनिटापेक्षा अधिक कालावधी उलटूनही स्वर्गरथ न आल्याने मृतकाच्या नातेवाईक व मित्रांनी त्याचा मृतदेह खासगी वाहनामध्ये टाकला. सदर मृतदेह अंत्ययात्रेसह सरळ नगर परिषदेमध्ये आणण्यात आला. अंत्ययात्रेमध्ये ४० ते ५० नागरिक सहभागी होते. तोपर्यंत स्वर्गरथही नगर परिषदेमध्ये परत आला होता. अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेच्या विरोधात घोषणा दिल्या. त्याचबरोबर स्वर्गरथाची तोडफोड केली. त्यानंतर अगदी १० मिनिटातच प्रेत उचलला व कठाणी नदी घाटाकडे घेऊन गेले. विशेष म्हणजे, अंत्ययात्रीमध्ये एका नगरसेवकाचाही समावेश होता.
याबाबतची तक्रार नगर परिषदेने रात्री ९ वाजता गडचिरोली सादर पोलिसांकडे केली आहे. या घटनेची चौकशी केल्यानंतर तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे. (नगर प्रतिनिधी)