लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील बोरी येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंचाला विकासकामांच्या निधीचा हिशेब ग्रामसभेत अनेकदा मागीतला हाेता, मात्र हिशेब न मिळाल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीला विरोध दर्शवित कोरचीपासून १२ किमी अंतरावर येत असलेल्या बोरी गावातील संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीला १२ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजताच कुलूप ठोकले. सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय योजनांमधून विविध कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या कामांचा जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीने नागरिकपुढे ठेवल्याशिवाय सरपंच पदाची निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. यासंदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगार यांना दि. ९ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले होते. शुक्रवारी होत असलेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीसाठी पोलिसांनी सकाळी बोरी ग्रामपंचायतला चोख बंदोबस्त ठेवला. यामध्ये पोलिसांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण नागरिक समजण्यास तयार नव्हते. यानंतर दहा वाजताच्या सुमारास तहसीलदार छगनलाल भंडारी, नायब तहसीलदार रेखा बोक्के व पटवारी, कोतवाल कर्मचारी यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला झालेल्या सर्वच कामाचा हिशेब १८ तारखेच्या चौकशीत नक्की देणार, पण निवडणूक होऊ द्या, असे आश्वासन दिले. परंतु येथील नागरिकांनी ते मान्य केले नाही. पंचायत समिती सवर्ग विकास अधिकारी देवीदास देवरे, विस्तार अधिकारी राजेश फाये ग्रामपंचायतस्थळी आले. या प्रकरणाची चाैकशी केली जाईल, असे आश्वासन तहसीलदारांनी नवनियुक्त सदस्यांना दिल्याने त्यांचे समाधान झाले.
सरपंचपदासाठी शनिवारी अर्जसरपंच पदासाठी शुक्रवारी निवडणूक हाेती. मात्र ग्रामपंचायतीला कुलूप ठाेकल्याने दिवसभर गाेंधळ उडाला हाेता. त्यामुळे शनिवारी निवड घेतली जाईल, अशी माहिती तहसीलदार छगणलाल भंडारी यांनी फाेनवरून दिली आहे. मतदानाची प्रक्रिया शांतते पार पडेल, अशी अपेक्षा आहे.