दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या दूत परिचारिका
By Admin | Updated: May 12, 2015 01:16 IST2015-05-12T01:16:54+5:302015-05-12T01:16:54+5:30
रस्ते, पाणी, शिक्षण यासह मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असणाऱ्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याचे खडतर कार्य

दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या दूत परिचारिका
गोपाल लाजूरकर ल्ल गडचिरोली
रस्ते, पाणी, शिक्षण यासह मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असणाऱ्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याचे खडतर कार्य परिचारिका भगिनी नियमित करीत आहेत. जिल्हा नक्षलग्रस्त व आदिवासीबहूल नावाने ओळखला जात असतानाही या क्षेत्रात स्वत:च्या कर्तव्याप्रति दक्ष राहून नर्सेस भगिनी सेवा बजावित आहेत. सोयीसुविधांचा अभाव असतानाही आरोग्य सेवा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे त्यांचे कार्य निश्चितच इतर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायीच आहे.
‘आरोग्य सुविधा आपल्या दारी’ या वाक्याचा प्रत्यय नर्सेस भगिनींच्या कर्तव्यातून येतो. गावपातळीवर रस्त्यांचा अभाव असतानाही प्रत्येक कुटुंबातील सदस्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे व्रत स्वीकारलेल्या नर्सेस भगिनींचे कार्य जिल्ह्यात मोठेच म्हणावे लागेल.
आरोग्याची सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंतच नव्हे तर त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची महत्वाची भूमिका पार पाडणारी परिचारिका आपल्या कर्तृत्वाने खरोखरीच आरोग्यदूत ठरल्या आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागात आरोग्याच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे अविरत कार्य परिचारिका भगिनी करीत आहेत. दुर्गम भागातील अनेक भगिनी आपली सेवा प्रामाणिकपणे कुठल्याही भौतिक साधनांशिवाय पार पाडत आहेत. जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याची स्फूर्ती लंडन येथील परिचारिका फ्लॉरेंस नायटिंगल यांच्या कार्यांमुळे मिळाली. त्यामुळे फ्लॉरेंस नायटिंगल यांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे म्हणून त्यांचा १२ मे हा जन्मदिवस जगात ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा करण्याची पद्धत रूढ झाली. त्यामुळे ग्रामीणस्तरावरील परिचारिकांना नायटिंगल यांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे हा जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यामागील उद्देश आहे.
जिल्ह्यातील ३७६ आरोग्य उपकेंद्रात ४१२ आरोग्य सेविका कार्यरत आहेत. तर ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास ५५ आरोग्य सहाय्यिका कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्य सेवेचा गाडा रेटला जात आहे. त्यामुळे गावपातळीवर तत्काळ व परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होत आहे. आदिवासी, गरीब, वंचित रुग्णांसाठी परिचारिका झटत असल्या तरी त्यांच्या अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. ४०४ नर्सेस भगिनींना अद्यापही नियमित/स्थायी करण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे, १२ व २४ वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देणे, एलएचव्ही व महिला विस्तार अधिकाऱ्यांना पदोन्नती देणे, कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहिन्याच्या ५ तारखेच्या आत करणे आदी समस्या प्रलंबित आहेत. मात्र या समस्यांची सोडवणूक करण्याकडे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व शासन उदासीन असल्याचे चित्र आहे.
संघटनेतर्फे कर्मचाऱ्यांचा केला जातो गौरव
४ग्रामीण भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा बजाविणाऱ्या तसेच उत्कृष्ट आरोग्यसेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या नर्सेस भगिनींचा संघटनेच्या वतीने दरवर्षी सत्कार केला जातो. सेवानिवृत्त आरोग्यसेविका व आरोग्य सहाय्यिकांना साडीचोळी देऊन सन्मानित केले जाते. यंदा १२ सेवानिवृत्त नर्सेस भगिनींचा सत्कार संघटनेच्या वतीने केला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट आरोग्यसेवा देणाऱ्या नर्सेस भगिनींनाही सन्मानित केले जाणार आहे. याकरिता प्रत्येक तालुक्यातून सहा अशाप्रकारे एकूण ३६ नर्सेस भगिनींची निवड केली जाणार आहे. मागील वर्षी रक्तदान शिबिरात १४ जणांनी रक्तदान केले होते.
शासनाच्या वतीने परिचारिका दिन साजरा केला जातो. मात्र परिचारिकांच्या सेवाअंतर्गत अनेक समस्या सोडविण्याबाबत वरिष्ठ अधिकारीही गंभीर नाहीत. केवळ दिन साजरा न करता परिचारिकांच्या समस्या सोडविण्यावर शासन व प्रशासनाने भर द्यावा, अशी नर्सेस संघटनेची अपेक्षा आहे. याकरिता अधिकाऱ्यांनीही शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- माया सिरसाट, जिल्हाध्यक्ष, नर्सेस संघटना, गडचिरोली