अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करणार
By Admin | Updated: December 2, 2014 23:07 IST2014-12-02T23:07:35+5:302014-12-02T23:07:35+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार या प्रश्नांचा पाठपुरावा शासनाकडे करण्यात आला. मात्र अद्यापही केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करणार
वेतनाचा प्रश्न त्वरित निकाली काढा : १२ ला देणार नागपुरात धडक
गडचिरोली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार या प्रश्नांचा पाठपुरावा शासनाकडे करण्यात आला. मात्र अद्यापही केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे येत्या १२ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर मोर्चा काढला जाईल, असा निर्णय एटापल्ली, मुलचेरा येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला.
अंगणवाडी महिला मेळाव्याला प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. एटापल्ली येथे अध्यक्षस्थानी छाया कागदेलवार होत्या. यावेळी लिनीग्रेस केरकट्टा, अनुसया झाडे, वत्सला सुंकेपाकवार, जीजा रामटेके, माधुरी गड्डमवार, लीला गेडाम, सुमन गावडे, बबिता मडावी उपस्थित होत्या. मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मानधन निघाले नाही. त्यामुळे अनेक अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित देण्यात यावे, ४५ व्या श्रम संमेलनात पारित झालेल्या ठरावानुसार अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा, पेंशन देण्यात यावी आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली.
मुलचेरा येथे पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आलोराणी सरकार होत्या. यावेळी कुसुम नैताम, करूणा बिश्वास, अरूणा आत्राम, प्रमिला कडपे, बेबी पल्लो, ममता फौजदार, बिना पाल, पंचशिला गोंगले, भगवती गाईन, मधुमाला मजुमदार आदी उपस्थित होत्या. ५ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केले आहे.