Anganwadi workers' agitation | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोर धरणे : थकीत भत्ता, इंधन बिल व पेंशन देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षिकेचा दर्जा देऊन किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करावी, या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवार २३ सप्टेंबरला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जि.प.सीईओंमार्फ त शासनाला पाठविण्यात आले.
निवेदनात आयसीडीएसचे खासगीकरण करून नये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण सप्ताह, अमृतआहार योजना, गृहभेटी, कुपोषण निर्मूलन व अंगणवाडीतील इतर कामे करावी लागतात. त्यामुळे कोविड सर्वेक्षण व माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचे काम देऊ नये. कर्मचाऱ्यांचा थकीत प्रवास भत्ता व इंधन बिल द्यावे. सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा. मिनी अंगणवाडी सेविकेला नियमित सेविकेएवढे मानधन द्यावे. अमृत आहार योजनेचे मानधन निकाली काढावे. बेबीकिटसह अन्य साहित्य अंगणवाडीला द्यावे. आरमोरी तालुक्यातील सेविका व मदतनीसाची पदे भरावी. मानधनाच्या निम्मी रक्कम पेंशन म्हणून द्यावी. प्रत्येक अंगणवाडी केंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधावी. कर्मचाऱ्यांना आजारपणात भर पगारी रजा द्यावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

असंघटीत कामगारांच्या समस्या सोडवा
अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, गटप्रवर्तक, शापोआ कर्मचारी, हातपंप देखभाल व दुरूस्ती, कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, मासिक पेंशन द्यावे. तसेच त्यांना सामाजिक सुरक्षा लागू करावी. गरजूंना सहा महिन्यांपर्यंत दरडोई १० किलो मोफत अन्नधान्य द्यावे. यासह एकूण ३५ मागण्यांचा समावेश होता. आंदोलनात आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, सचिव जगदीश मेश्राम, डॉ.महेश कोपुलवार आदी सहभागी झाले.

Web Title: Anganwadi workers' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.