अंगणवाडी महिलांचा आक्रोश
By Admin | Updated: September 2, 2014 23:45 IST2014-09-02T23:45:22+5:302014-09-02T23:45:22+5:30
अंगणवाडीच्या माध्यमातून दुर्गम भागातील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. तसेच त्यांचे आरोग्य सांभाळण्यासह त्यांना पोषण

अंगणवाडी महिलांचा आक्रोश
चामोर्शी/अहेरी : अंगणवाडीच्या माध्यमातून दुर्गम भागातील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. तसेच त्यांचे आरोग्य सांभाळण्यासह त्यांना पोषण आहाराचा पुरवठाही करतात. प्रामाणिकपणे सेवा देत असतांनाही अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे. त्यामुळे चामोर्शी व अहेरी तालुक्यातील संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासन व प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त केला.
अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी वीणा चन्नावार होत्या. तसेच या मेळाव्याला चामोर्शी प्रकल्प कार्यालयाच्या भागातून शेकडो अंगणवाडी महिला सेविका व मदतनिस उपस्थित झाल्या होत्या. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, तीन वर्ष लोटूनही केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ केली नाही. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने गोरगरीब जनतेची फसवणूक केली आहे. मानधनात वाढ न करण्यात आल्याने अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी यापुढेही तीव्र लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केले.
या मेळाव्याचे आभार प्रदर्शन सुनीता उडाण यांनी केले. या मेळाव्याला दुर्गा जांपलवार, अंजना बोईनवार, कांता मोहुर्ले, शोभा मेक्कलवार आदींसह शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
अहेरी बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी काम केले आहे. मात्र या महिला कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. तसेच या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षापासून इंधन बिल थकीत आहे. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना तत्काळ चार महिन्याचे मानधन अदा करण्यात यावे, तसेच तीन वर्षापासूनचे इंधन बिल देण्यात यावे, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी डी. एस. वैद्य व विटाबाई भट यांच्या नेतृत्वात अहेरीच्या प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात महिलांनी नारेबाजी केली.