अंगणवाडी महिलांचा देशव्यापी लढा उभारणार
By Admin | Updated: December 12, 2015 04:07 IST2015-12-12T04:07:17+5:302015-12-12T04:07:17+5:30
केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा फटका अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना बसला असून नियमित मानधन मिळत

अंगणवाडी महिलांचा देशव्यापी लढा उभारणार
देसाईगंज : केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाचा फटका अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना बसला असून नियमित मानधन मिळत नसल्यामुळे महिला कर्मचारी अडचणीत आले आहेत. अंगणवाडी महिलांच्या विविध प्रश्नांबाबत अंगणवाडी महिलांचा देशव्यापी लढा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिली आहे.
देसाईगंज येथे देसाईगंज तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा बुधवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहिवडे बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी महिला कार्यकर्त्या सपना रासेकर होत्या. भाजपमधील सत्ताधारी नेते केवळ घोषणाबाजी करीत आहेत. त्यामुळे सरकारविरोधात जनमाणसात रोष आहे. एकात्मिक बालविकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने पुरेशा प्रमाणात आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे सदर योजना कशी चालवायची, या विवंचनेत मंत्र्यांसह विभागाचे अधिकारी सापडले आहेत, असे सांगत प्रा. दहिवडे यांनी सत्ताधारी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.
मेळाव्याचे आभार प्रदर्शन निशा कामडी यांनी केले. यावेळी मीनाक्षी देवस्कर, शमशार बेगम शेख, रजनी भानारकर, गीता सवाईथुल, अर्चना मेश्राम, शीतल मेश्राम, माया देशमुख, यशोधरा मेश्राम आदींसह बहुसंख्य अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. (वार्ताहर)