अंगणवाडी महिलांची चिटफंडकडून फसवणूक
By Admin | Updated: June 18, 2016 00:54 IST2016-06-18T00:54:45+5:302016-06-18T00:54:45+5:30
अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून अंगणवाडी महिलांवर दबाव टाकून मैत्र या चिटफंड कंपनीचे सदस्य बनविले.

अंगणवाडी महिलांची चिटफंडकडून फसवणूक
रमेशचंद्र दहिवडे : पर्यवेक्षिकांवर कारवाई करा
चामोर्शी : अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून अंगणवाडी महिलांवर दबाव टाकून मैत्र या चिटफंड कंपनीचे सदस्य बनविले. आता मैत्र ही कंपनी पसार झाल्यामुळे गोरगरीब अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांची लाखो रूपयांनी फसवणूक झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून चिटफंड कंपनीचे सदस्य बनविण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पर्यवेक्षिकांवर कारवाई करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.
अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा मेळावा दुर्गा जाम्पलवार यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी येथे बुधवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अंगणवाडीच्या मासिक अहवाल बैठकांमध्ये दर महिन्याला अंगणवाडी महिलांकडून मैत्रीची नावाखाली नियमित वसुली केल्या जात होती. या सर्व प्रकाराला अंगणवाडी पर्यवेक्षिकाच जबाबदार आहेत. त्यामुळे जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, तसेच संबंधित दोषी पर्यवेक्षिकावर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. दहिवडे यांनी यावेळी केली.
प्रास्ताविक ज्योती बेजंकीवार यांनी तर आभार सुशिला बुरांडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी माया अहीरकर, सुनीता वद्देलवार, छाया आभारे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)