आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविणार - सुरेश माने
By Admin | Updated: August 28, 2015 00:10 IST2015-08-28T00:10:08+5:302015-08-28T00:10:08+5:30
आंबेडकरी चळवळ राजकारणात यशस्वी होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करीत आहेत.

आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविणार - सुरेश माने
आरमोरीत आंबेडकरी युवा संमेलन : शेकडो युवकांची उपस्थिती
आरमोरी : आंबेडकरी चळवळ राजकारणात यशस्वी होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करीत आहेत. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवकांचा कार्यकर्त्यांचा वापर विविध पक्ष करीत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात ही चळवळ यशस्वी झाली नाही. भूतकाळात झालेल्या चुका भविष्यात होऊ नये याची खबरदारी घेणे ही आजची गरज आहे. येणाऱ्या पाच वर्षात सक्रीय युवकांना चळवळीत घेऊन आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविली जाईल, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत तथा संविधानतज्ज्ञ अॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.
बहुजन रिपब्लिकन आंबेडकर राईट्स मुव्हमेंटच्या वतीने आरमोरी येथील साई सभागृहात बिरसा मुंडा, फुले, शाहू, आंबेडकरी युवा संमेलन, डॉ. बाबासाहेबानंतर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक व राजकीय स्तरावर अपयश का? आजचा तरूण आंबेडकरी चळवळीपासून का दुरावतोय? कारणे व उपाय या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये होते. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अॅड. भुपेन रायपुरे, नंदू नरोटे, संजय मंगर, विजय ठवरे, सर्वजीत बन्सोडे, संजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी किशोर गजभिये यांनी मार्गदर्शन करताना आजच्या युवा पिढीवर भविष्याची जबाबदारी आहे. त्यामुळे व्यवस्थेला आव्हान देऊन लढण्याची ताकद युवकांमध्ये निर्माण करण्याचे काम आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांनी केले पाहिजे. काही लोक दलित, आदिवासी व बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. जुने विचार डोक्यातून काढून नवीन विचारांची साठवणूक करा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. कैलाश नगराळे, खिरेंद्र बांबोळे, राज बन्सोड, बाळू टेंभुर्णे, मोरेश्वर बारसागडे, यशवंत जांभुळकर, क्षिरसागर शेंडे, किशोर सहारे, अनिल ठवरे, जयकुमार शेंडे, देवा बनकर, हिरा राऊत, गणपत तावाडे यांनी सहकार्य केले.