लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सर्वत्र नवरात्रोत्सवाची लगबग सुरू असताना, तालुक्यातील पूलखल गावासाठी २२ सप्टेंबरची सकाळ मोठी धक्कादायक ठरली. तीन वर्षांपूर्वी मुलाच्या खुनात सहभागी असलेल्या व वर्षभरापूर्वी जामिनावर कारागृहातून सुटलेल्या महिलेवर वडिलांनी सूड उगवत कुन्हाडीचे घाव घालून संपविले. 'खून का बदला खून'च्या या थरारपटाने जिल्हा हादरला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ललिता देवराव गेडेकर (५५, रा. पूलखल ता. गडचिरोली) असे मृतक महिलेचे नाव आहे, तर याच गावातीलच रामकृष्ण मेश्राम (६०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सन २०२२ मध्ये रामकृष्ण यांचा मुलगा कैलास मेश्राम (वय २८) याला ललिता आणि तिचा मुलगा नरेश देवराव गेडेकर (वय २१) या दोघांनी फावड्याने वार करून ठार केले होते. ललिता वर्षभरापूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आली होती. मुलाच्या खुनात सहभागी असल्याने वडील रामकृष्ण यांच्या मनात ललिताबद्दल राग होता.
आरोपी ताब्यात, चौकशी सुरू
पंचनामा करून गडचिरोली ठाण्याच्या पोलिसांनी ललिताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. संशयित आरोपी रामकृष्ण मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल केला, त्यास घरातून ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. पो.नि. विनोद चव्हाण, उपनिरीक्षक दीपक चव्हाण व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
आवाज ऐकून लोक धावले, पण...
- ललिताच्या आवाजानंतर परिसरातील शेतकरी सतर्क झाले, पण धान उंच वाढलेले असल्याने ती कोणत्या बांधीत कोसळली हे लवकर समजून येत नव्हते.
- इकडे ललिताचा खून करून रामकृष्ण मेश्राम हा झाडे व उंच वाढलेल्या धानाच्च्या आडोशातून गायब झाला. मात्र, ती जिवाच्या आकांताने ओरडल्याने काही तरी आक्रित घडल्याची कुणकुण शेतकऱ्यांना लागली होती.
- त्यांनी शोधाशोध सुरू केल्यावर तब्बल दोन 3 तासांनी तिचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह एका बांधीत आढळला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
शेतात एकटीला गाठून आरोपीने साधला डाव
२२ सप्टेंबरला ललिताबाई स्वतःच्या शेतात निंदणासाठी गेली होती. ती शेतात एकटी असल्याचा फायदा घेत रामकृष्ण गेडेकर हा देखील तिच्या मागोमाग शेतात पोहोचला. त्याने ललितावर कुऱ्हाडीने वार केला. तिने वाचवा... वाचवा... असा आवाज केला, पण जवळ कोणीच नव्हते. यावेळी ती धावताना धानाच्या बांधीत कोसळली. यानंतर रामकृष्ण गेडेकर याने पुन्हा तिच्यावर सपासप वार केले व तेथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.