खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप
By Admin | Updated: January 15, 2017 01:37 IST2017-01-15T01:37:36+5:302017-01-15T01:37:36+5:30
नाबार्डच्या सहकार्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे तालुक्यातील शिवणी येथे आर्थिक साक्षरता

खातेदारांना एटीएम कार्डचे वाटप
शिवणीत साक्षरता मेळावा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम
गडचिरोली : नाबार्डच्या सहकार्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे तालुक्यातील शिवणी येथे आर्थिक साक्षरता केंद्रांमार्फत डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृती मेळावा शुक्रवारी घेण्यात आला. या मेळाव्यात बँकेतर्फे खातेदारांना रूपे एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंचावर जिल्हा बँकेचे संचालक डॉ. बळवंत लाकडे, विकास विभागाचे सहायक व्यवस्थापक आर. वाय. सोरते, कनेरीच्या सरपंच विना मडावी, जिल्हा बँकेचे अधिकारी के. के. साखरे, गडचिरोली शाखेचे निरिक्षक एम. डी. रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
वित्तीय समावेशन आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केलेल्या नोटबंदीच्या घोषणेनुसार व भारतातील बँकेच्या ग्राहकांनी कॅशलेसचा वापर करण्याच्या उद्देशाने शिवणी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने डिजीटल आर्थिक साक्षरता जनजागृती मेळावा घेण्यात आला आहे. याप्रसंगी मान्यवरांनी एटीएम कार्डाचा वापर कशा पध्दतीने करावा, आधार कार्ड क्रमांकाचे महत्त्व, बँकेच्या बचत खात्याशी आधार क्रमांक व मोबाईल नंबर संलग्नित करणे आदी विषयांवर चित्रफीतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक डॉ. बळवंत लाकडे यांच्या हस्ते बँक खातेदारांना एटीएम कार्डाचे वाटप करण्यात आले. ग्राहकांनी कॅशलेसचा वापर वाढवावा, असे आवाहन डॉ. लाकडे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)