विद्यार्थ्यांना मुदतबाह्य औषधाचे वाटप
By Admin | Updated: December 25, 2015 02:03 IST2015-12-25T02:03:35+5:302015-12-25T02:03:35+5:30
येथून जवळच असलेल्या पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फिरते आरोग्य तपासणी पथकाकडून मुदतबाह्य ...

विद्यार्थ्यांना मुदतबाह्य औषधाचे वाटप
पाथरगोटा येथील प्रकार : औषधाचा बनला गोळा; रंगही बदलला
जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फिरते आरोग्य तपासणी पथकाकडून मुदतबाह्य व आरोग्यास धोकादाय औषधाचे वितरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुदतबाह्य झालेल्या एकाच औषधाच्या वेगवेगळ्या बॉटलमधील औषधाचा रंग काळा, लाल, गुलाबी झाला आहे. यातील काही औषधांचा गोळाही तयार झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असून सदर औषधाचे वितरण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्ग व नागरिकांनी केली आहे.
आरमोरी तालुका फिरते आरोग्य तपासणी पथकाने २२ डिसेंबर रोजी पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. या जिल्हा परिषद शाळेत एकूण १४० विद्यार्थी शिक्षण घेत असून सर्वच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १० ते २० विद्यार्थी सोडले तर सर्वच विद्यार्थ्यांना पॅरासिटामल या कंपनीच्या औषधीचे वितरण करण्यात आले. या औषधाच्या बॉटलवर मुदत संपण्याची तारीख डिसेंबर २०१५ अशी दर्शविण्यात आली आहे. म्हणजेच औपचारिकरित्या मुदत संपण्यासाठी आता केवळ पाच ते सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रत्यक्षात मात्र सदर औषध खराब झाले असल्याचे दिसून येते. एकाच बॅच नंबरच्या काही बॉटलमधील औषध काळे, लाल, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगाचे झाले आहेत. काही औषधीचा गोळा निर्माण झाला आहे. यावरून सदर औषध खराब झाले असल्याचे सर्वसामान्य नागरिकालाही लक्षात येते. मात्र ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
काही पालकांनी औषधाची मुदत बघून आपल्या पाल्याला औषध घेण्यास मज्जाव केला. मात्र ज्या पाल्यांचे पालक अशिक्षित होते, त्या पाल्यांनी औषधाचे सेवन केले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना डोकेदुखी, उलटी हा त्रास जाणवायला लागला. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत खेळ खेळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे. (वार्ताहर)