शांतता मेळाव्यात नागरिकांना वस्तूंचे वाटप
By Admin | Updated: August 1, 2016 01:33 IST2016-08-01T01:33:41+5:302016-08-01T01:33:41+5:30
२८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षली सप्ताह जिल्ह्यात पाळला जात आहे.

शांतता मेळाव्यात नागरिकांना वस्तूंचे वाटप
गडचिरोली : २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षली सप्ताह जिल्ह्यात पाळला जात आहे. या सप्ताहात जिल्ह्यात नक्षली कारवाया घडू नयेत, शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी याकरिता पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी शांतता रॅली व मेळावे आयोजित करून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. यावेळी नागरिकांना विविध साहित्यांचे वितरणही केले जात आहे.
भामरागड - पोलीस विभागाच्या वतीने भामरागड येथे शांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पोलिसांच्या वतीने गावात शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीला उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीत जि. प. समूह निवासी शाळा, जय पेरसापेन आश्रमशाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, भगवंतराव माध्यमिक तथा ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते. समारोपीय कार्यक्रमात आदिवासी बांधवांना साहित्य, कपडे वितरित करण्यात आले. या मेळाव्यात कृषी, महसूल, वन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व विविध विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यात आली. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, अपंग योजना, श्रावणबाळ योजना, सुकन्या योजना, शेतकरी अपघात विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा योजना, अनुसूचित जाती- जमाती योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन, परिसर स्वच्छता, ग्रामसभेचे महत्त्व, पेसा कायदा आपतकालीन परिस्थितीत उपाययोजना, शौचालयाचे महत्त्व आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी क्रीडा स्पर्धा, गीतगायन, ढोलकीवादन, मनोरंजनात्मक चित्रपटही दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आनंद गलबले, वैशाली पुण्यप्रेडिवार तर आभार प्रमोद बनकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस ठाणे भामरागड, पोलीस मदत केंद्र ताडगाव, धोडराज येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
एटापल्ली - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय एटापल्लीच्या वतीने चार दिवसीय शांतता मेळाव्याचा समारोप शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, न. पं. उपाध्यक्ष रमेश गंपावार, पं. स. उपसभापती संजय चरडुके, तहसीलदार संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव उपस्थित होते. चार दिवसीय मेळाव्यात पहिल्या दिवशी शांतता रॅली व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी नागरिकांना विविध योजनांची माहिती तसेच सांस्कृतिक कला पथकाद्वारे जनजागृती कार्यक्रम, शेतकऱ्यांना कीड नियंत्रणावर मार्गदर्शन, आरोग्य चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आला. तिसऱ्या दिवशी योगासने व बचत गटाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शनिवारी आत्मसमर्पण योजनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांनी दिली. यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कुरखेडा - उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने चार दिवसीय शांती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नागरिकांसाठी समाज प्रबोधन, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापक, पेसा कायद्याची माहिती, पथनाट्य, चित्रपट, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक माहिती देण्यात आली. समारोपीय कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, पोलीस निरीक्षक विलास सुटे, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, पशुधन अधिकारी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. समाजाच्या विकासात अडथळा निर्माण करू पाहणाऱ्या लोकांना सहकार्य करू नका, कोणतीही प्रलोभणे व भूलथापांना बळी पडू नका, नक्षल्यांना सामूहिकरित्या गावबंदी करा, असे आवाहन अभिजीत फस्के यांनी केले. कार्यक्रमात नागरिकांना वस्तू व कपडे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पी. एस. आय. गिरी तर आभार सुधीर कटारे यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)