आत्मसमर्पितांना भूखंड व धनादेश वाटप
By Admin | Updated: October 5, 2015 01:49 IST2015-10-05T01:49:07+5:302015-10-05T01:49:07+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित हे शुक्रवार व शनिवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

आत्मसमर्पितांना भूखंड व धनादेश वाटप
पोलीस महासंचालकांच्या हस्ते : दोन दिवसांच्या दौऱ्यात नक्षलविरोधी अभियानाचा घेतला आढावा
गडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित हे शुक्रवार व शनिवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. पोलीस महासंचालक दीक्षित यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात पाच आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांना भूखंड व नऊ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
पोलीस महासंचालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील शहीद स्मारकाला श्रध्दांजली अर्पण केली. तसेच शहीद दालनाला भेट दिली. यावेळी शहीद कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सदर समस्या निकाली काढण्याची ग्वाही दिली. छत्तीसगड सीमेलगत सावरगाव पोलीस मदत केंद्र व जिमलगट्टा उपपोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. येथील पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शनही केले. बाहेरजिल्ह्यातील जवान गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस दलात दाखल होतात. ते नक्षल विरोधी अभियानामध्ये व्यस्त होत असल्यामुळे त्यांना घरगुती कौटुंबिक अडचणी सोडविता येत नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल खचते. याचाच परिणाम नक्षलविरोधी अभियानावर होतो. ही बाब पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांच्या लक्षात आणून दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.