आघाडी, युती दुभंगल्याने राजकीय समीकरणही बदलणार
By Admin | Updated: September 27, 2014 01:41 IST2014-09-27T01:41:01+5:302014-09-27T01:41:01+5:30
गुरूवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप होऊन शिवसेना, भाजपची २५ वर्षाची युती तुटली.

आघाडी, युती दुभंगल्याने राजकीय समीकरणही बदलणार
गडचिरोली : गुरूवारी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप होऊन शिवसेना, भाजपची २५ वर्षाची युती तुटली. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचीही १५ वर्षानंतर काडीमोड झाली. याचे पडसाद जिल्ह्याच्याही राजकारणात झपाट्याने पडले आहे. राजकीय समीकरणही मोठ्या प्रमाणावर बदलण्याचे चिन्ह दिसू लागली असून मोठ्या राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक पक्षांना उमेदवार शोधतानाही दमछाक करावी लागत आहे. अनेक ठिकाणी इतर पक्षातून आयात केलेले उमेदवार आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार बनविण्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातही सुरू होण्याची चिन्ह दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तीनही विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदार संघामध्ये जिल्हा निर्मितीपासून विधानसभा निवडणुका लढणारे ठराविकच उमेदवार आहेत. तेच आलटून पालटून एक-दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरत असतात. तर काही राजकीय पक्षांना विशिष्ट घराणेशाहीने ‘हायर’ केले आहे. त्यामुळे या घराण्यातील लोकांना वारंवार पक्षाकडून उमेदवारी दिली जात असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते आपण सतरंज्याच उचलत राहायच्या का? या मानसिकतेत आले आहे. यंदा शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याने मोठी चुरशीची लढत जिल्ह्यात होणार आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप व नाविस युतीचे उमेदवार म्हणून अम्ब्रीशराव महाराजांनी रणशिंग फुंकले आहे. काँग्रेस पक्षाकडून येथे मुक्तेश्वर गावडे गुरूजी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर अपक्ष म्हणून विद्यमान आमदार दीपक आत्राम पुन्हा मैदानात उभे ठाकतील. शिवसेनेने रामसाय पोचा मडावी यांना अहेरीतून उमेदवारी दिली आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने सगुणा पेंटारामा तलांडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र शनिवारी विद्यमान काँग्रेस आमदार डॉ. नामदेव उसेंडी हेही नामांकन पत्र दाखल करणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून डॉ. देवराव होळी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपच्यावतीने शंभुविधी गेडाम यांचा डमी उमेदवारी अर्जही भरल्या जाणार आहे, अशी माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेने वासुदेव शेडमाके यांना गडचिरोलीतून उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मीनाक्षी कोडाप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याशिवाय बसपाकडून कोण उमेदवार राहतो, याकडेही अनेकांचे लक्ष आहे. भारिप व बहुजन महासंघाने पुरूषोत्तम गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
आरमोरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून डॉ. रामकृष्ण मडावी हे उमेदवार आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून क्रिष्णा दामाजी गजबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हरिराम वरखडे व जयदेव मानकर यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय चंदेल गटाकडूनही जयेश चंदेल यांना आरमोरी तर गडचिरोली व अहेरीतही उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. या साऱ्या राजकीय घडामोडीत मतदार राजा योग्य तो निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)