चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:01 IST2018-03-18T00:01:53+5:302018-03-18T00:01:53+5:30
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम सुरु आहे. सदर बॅरेज मार्र्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस तीन किमीवर आहे.

चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे बंद करणार
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस पाच किमी अंतरावर वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेजचे बांधकाम सुरु आहे. सदर बॅरेज मार्र्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरच्या बाजूस तीन किमीवर आहे. या बॅरेजची एकूण लांबी ६९१ मिटर असून १५ मिटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ पोलादी दरवाजे बसविण्यात आलेले आहेत. सदर बॅरेजचे काँक्रिट बांधकाम व दरवाज्यांची उभारणी पूर्ण झालेली आहे. दरवाजामधून पाणी गळती होऊ नये या करिता त्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी सदर प्रकल्पाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येणार आहे.
२५ मार्च २०१८ पासून सर्व दरवाजे बंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नदी पात्रात उर्ध्व बाजूस व नदीत आलेले नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे व नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे. या पाणीसाठ्यामुळे जिवित व वित्तहाणी होऊ नये म्हणून सर्व लगतचे गावांना, ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येते की, त्यांनी आपल्या गावकऱ्यांना या बाबत गावात दवंडीव्दारे सुचीत करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात. या कार्यालयाकडून ज्या शेताचे भूसंपादन किंवा सरळ खरेदी करण्यात आली आहे. त्या सर्व भुधारकांनी शेतातील कामे करताना खबरदारी घ्यावी किंवा खरेदी करण्यात आलेल्या शेतामध्ये शेतीची कोणतीही कामे करु नयेत असेही कळविण्यात यावे. सर्व मासेमारी करणारे व पशुपालक यानी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून नदी ओलांडू नये. रेती घाटातून रेती काढणारे इत्यादी लोकांनी खबरदारी घ्यावी. अन्यथा होणाºया नुकसानीस पाटबंधारे विभागाचे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच सद्यस्थितीत जो पाणीसाठी होणार आहे तो फक्त चाचणी करीता असल्यामुळे प्रकल्पातून केव्हाही पाणी सोडल्या जाऊ शकते, त्यामुळे प्रकल्पाच्या खालील बाजूच्या नागरिकांनी देखील दक्षता घेणे आवश्यक आहे. अशी माहिती चंद्रपूर येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.