कुरखेडातील २० गावांमधील दारू हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:13 IST2017-08-29T00:13:24+5:302017-08-29T00:13:53+5:30
कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दितील ४४ गावांपैकी २० गावात महिला मंडळांनी दारू बंदीचा निर्णय घेऊन .....

कुरखेडातील २० गावांमधील दारू हद्दपार
सिराज पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दितील ४४ गावांपैकी २० गावात महिला मंडळांनी दारू बंदीचा निर्णय घेऊन त्याची कडक अंमलबजावणी करणे सुरू केल्याने या गावांमधील दारू हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कायद्याने जे जमले नाही ते येथील महिलांनी करून दाखविले आहे. यासाठी कुरखेडाचे ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी कुरखेडा तालुक्यात या दारूबंदीचा प्रभाव कुठेच दिसून येत नव्हता. चोरी-छुप्या मार्गांनी दारूची आयात करून प्रत्येक गावात विक्री केली जात होती. अवैध दारू विकणाºया व्यक्तीला पोलीस गजाआड करीत होते. मात्र त्या व्यक्तीची लवकरच जामिनावर सुटका होते. जामिनावर सुटका झाल्याबरोबर पुन्हा दारू विक्रीचा व्यवसाय उघडतो. त्यामुळे दारूबंदीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे पोलिसांना आजपर्यंत तरी शक्य झाले नव्हते. गावातील दारूमुळे अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. कुरखेडा पोलीस स्टेशनचा प्रभार घेतल्यानंतर ठाणेदार योगेश घारे यांनी तालुक्यातील दारू हद्दपार करण्याचा निर्धार केला. गावागावात जाऊन महिला मंडळांच्या भेटी घेतल्या. महिलांना दारूमुळे होणारे जुने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समजावून सांगितला. महिलांनी पुढाकार घेतल्यास त्यांना पोलीस सहकार्य करतील. याबाबत विश्वास दर्शविला. त्यानंतर महिलांनी पुढाकार घेत दारूविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली. हातभट्टी, दारू विक्री ठिकाणांवर धाडी घालण्यास सुरूवात केली. सातत्याने पडणाºया धाडींमुळे दारू विक्रेते त्रस्त झाले व त्यांनी दारू विक्रीचा व्यवसाय सोडला. काही गावातील मोहीम थंडावल्या होत्या. मात्र ठाणेदारांनी पुन्हा मार्गदर्शन करून दारू विक्रेत्यांच्या विरोधात मोहिमा उघडण्यास प्रोत्साहित केले. सद्य:स्थितीत कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया एकूण ४४ गावांपैकी २० गावांमध्ये पूर्णपणे दारूबंदी झाली आहे. कुरखेडा शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी या गावात अवैध दारू विक्री सुरू होती. मात्र महिला मंडळाने धाड घालून संबंधित दारू विक्रेत्याला दम भरल्यानंतर दारू विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. यापूर्वी कठीण वाटणारी दारूबंदी यशस्वी होत आहे.
पोलिसांचे महिलांना मार्गदर्शन
कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गतच्या २० गावांमध्ये दारूबंदी झाली आहे. या दारूबंदीमध्ये महिलांचा पुढाकार आहे. मात्र या महिलांना कुरखेडा पोलिसांनी प्रोत्साहित केले आहे. एखाद्या ठिकाणी महिलांनी धाड टाकल्यानंतर पोलीस लगेच पोहोचत असल्याने महिलांचीही हिंमत वाढण्यास मदत झाली आहे.
कुरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच इतर ठाण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे इतर ठाण्यानीही अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविल्यास दारूबंदीची अंमलबजावणी करणे कठीण होणार नाही.
दारूबंदी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता महिलांचा सहभाग अतिशय परिणामकारक ठरेल. याचा अंदाज आला होता. कारण या व्यसनाची सर्वाधिक झळ महिलांना बसते. महिलांच्या सहकार्याने दारूबंदीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. ४४ गावांपैकी २० गावांमध्ये दारूबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे.
- योगेश घारे, ठाणेदार, कुरखेडा