आलापल्ली ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:46 IST2017-04-08T01:46:40+5:302017-04-08T01:46:40+5:30
अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांचे घोटाळे उघडकीस येऊनही

आलापल्ली ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराची चौकशी रखडली
जि.प. उपाध्यक्षांवरही नाराजी : आश्वासन पाळले नसल्याचा आरोप
प्रशांत ठेपाले आलापल्ली
अहेरी तालुक्यातील सर्वात मोठ्या आलापल्ली ग्रामपंचायतमध्ये अनेक आर्थिक व्यवहारांचे घोटाळे उघडकीस येऊनही त्याची साधी चौकशी सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एक महिन्यापूर्वी आलापल्ली ग्राम पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत सदर ग्रामपंचायतीचे अनेक घोटाळे उघडकीस आले. यामध्ये प्रामुख्याने सचिवाने स्वत:च्या नावाने पैशाची उचल केली आहे. तर काही सदस्यांच्या नावे सुध्दा धनादेश वटविण्यात आले. तसेच यात काही ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने सुध्दा धनादेश देण्यात आले आहे. सदर रक्कम ही नेमकी कशासाठी देण्यात आली, याचा खुलासा ग्रामसभेत सचिवाला करता आला नाही. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार हे सुध्दा उपस्थित होते. आलापल्ली ग्राम पंचायतीच्या इतिहासात सर्वाधिक गाजलेली व रात्री उशिरापर्यंत चाललेली ही ग्रामसभा चर्चेचा विषय ठरली.
याप्रसंगी उपस्थित असलेले जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थित गावकऱ्यांना आलापल्ली येथे ग्राम विकास अधिकाऱ्याचे पद असून प्रभारी ग्रामसेवक आपल्या पदाचा गैरवापर करीत आहे. येथे ग्राम विकास अधिकारी नियुक्त करतो. तसेच ग्रामसभेमध्ये खर्चाचा हिशोब न लागल्याने त्यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला याची माहिती दिली. रेकॉर्ड जप्त करायला लावला. आलापल्लीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. मात्र महिना लोटला. परंतु कंकडालवार यांनी दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उल्लेखनिय बाब म्हणजे, आलापल्ली क्षेत्राचे प्रतिनिधीत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार करीत आहेत, असे असताना ही परिस्थिती आहे. याचे नागरिकांना आश्चर्य वाटत आहे.
आलापल्ली ग्राम पंचायतीच्या परिस्थितीमुळे सर्वच प्रकारचे विकासकामे अडलेले आहेत. १४ वा वित्त आयोग, पेसा अंतर्गत सर्व कामे ठप्प असून तेंदू लिलावही दोनवेळा रद्द करावा लागला. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
ग्रा.पं.च्या कारभाराची चौकशी कुणी रखडविली ?
अहेरी पंचायत समितीपासून सात किमी अंतरावर असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड जप्त झाल्यापासून पंचायत समितीत चौकशीसाठी कोणीही आले नाही. ग्रामसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडून एक महिन्याचा कालावधी लोटला. चौकशी करायला विलंब का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांनी महिनाभरापूर्वी दिलेले चौकशीचे आश्वासन सध्या हवेतच विरले आहे. तसेच गावात पाण्याची समस्याही भीषण प्रमाणात उद्भवली असून मागील आठ महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईची तीव्रता अधिक वाढली आहे, असे असताना या समस्येकडेही जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे दुर्लक्ष झाले आहे.