आलापल्ली ग्रा. पं. वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
By Admin | Updated: May 14, 2015 01:23 IST2015-05-14T01:23:12+5:302015-05-14T01:23:12+5:30
आलापल्ली ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटाने निर्विवाद यश मिळविले आहे.

आलापल्ली ग्रा. पं. वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा
आलापल्ली : आलापल्ली ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्या गटाने निर्विवाद यश मिळविले आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी रेणुका अशोक कुळमेथे व उपसरपंचपदी पुष्पा रमेश अलोणे निवडून आल्या.
सरपंच पदासाठी धर्मरावबाबा आत्राम गटाकडून रेणुका कुळमेथे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर अपक्ष म्हणून चंद्रकला राकेश तलांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यात रेणुका कुळमेथे यांना ११ तर चंद्रकला तलांडे यांना सहा मते मिळाली. कुळमेथे पाच मतांनी विजयी झाल्या. तर उपसरपंच पदासाठी धर्मरावबाबा आत्राम गटाकडून पुष्पा रमेश अलोणे, अपक्ष म्हणून संतोष शंकर तोडसाम व विनोद व्यंकटेश अकनपल्लीवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी अकनपल्लीवार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अलोणे व तोडसाम यांच्यात लढत झाली. अलोणे यांना ११ तर संतोष तोडसाम यांना सहा मते मिळाली. परंतु ऐन निवडणुकीच्या वेळी रेणुका कुळमेथे यांच्या अर्जावरील सूचकाचे नाव चुकीचे लिहीलेले असल्याची तक्रार अपक्ष उमेदवाराने केली होती. परंतु निवडणूक अध्यासी अधिकारी एम. जी. हिमाची यांनी सदर तक्रारीवर काहीच निर्णय न दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून एम. जी. हिचामी, तलाठी एकनाथ चांदेकर, चंदू पस्पूनूरवार आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे स्वागत करण्यासाठी स्वत: माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होते.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा पक्षाचे प्रदेश सचिव इरफान पठाण यांनी सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनातच पक्षाला या ठिकाणी घवघवीत यश मिळाले. धर्मरावबाबा आत्राम यांना एका मोठ्या ग्राम पंचायतीवर सत्ता प्रस्थापित करता आली. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)