आलापल्लीचे बसस्थानक कुलूपबंदच
By Admin | Updated: May 8, 2014 02:20 IST2014-05-08T02:01:25+5:302014-05-08T02:20:02+5:30
अहेरी आगारापासून सात किमी अंतरावर आलापल्ली हे चौफर वर्दळीचे ठिकाण आहे.

आलापल्लीचे बसस्थानक कुलूपबंदच
अहेरी : अहेरी आगारापासून सात किमी अंतरावर आलापल्ली हे चौफर वर्दळीचे ठिकाण आहे. या ठिकाणी जुने बसस्थानक आहे. या बसस्थानकात सहाय्यक वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती महामंडळाच्यावतीने अद्यापही करण्यात न आल्याने आलापल्लीच्या बसस्थानकावरिल वाहतूक नियंत्रकाचे कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून कुलूपबंदच आहे. आलापल्ली बसस्थानकावरून जवळपास १८ तास बसेस ये-जा करीत असतात. येथून हैद्राबाद, शिर्डी, अमरावती, आकोट, वर्धा, लातूर, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, यवतमाळ आदी लांब पल्ल्याच्या जलद, निमआराम, साधारण बसेस तसेच मानव विकास मिशनच्या स्कूल बसेस धावतात. तसेच वर्धा, नागपूर आदी ठिकाणावरून सिरोंचा, चंद्रपूर, नागपूरकडे लांब पल्ल्याच्या बसेस सरळ धावतात.
भामराग, एटापल्ली, मुलचेरा आदी अतिदुर्गम भागातील मार्गावरही आलापल्ली बसस्थानकावरून बसेस सोडल्या जातात. या ठिकाणी दिवसभर बसेस व प्रवाशांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी नियंत्रक कार्यरत नसल्याने या ठिकाणावरून मोठ्या शहराकडे प्रवास करणार्या नव्या प्रवाशांना चौकशी करता येत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांना कोणत्या मार्गे प्रवास करावा, याची माहिती मिळत नाही. आलापल्ली येथे शासनाच्यावतीने बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी अद्यापही पक्क्या बसस्थानकाचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे पाच तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आलापल्ली येथे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम तसेच इतरही विभागाचे कार्यालय आहेत. आलापल्ली शहराची अहेरी, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली या तालुक्यातील नागरिकांचा संबंध येत असतो. ाात्र या ठिकाणी बसस्थानकाची स्वतंत्र इमारत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. येथे तत्काळ नवे बसस्थानकाची इमारत उभारून सहाय्यक वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)