अहेरीचा सुमित झळकला टीव्ही मालिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:24+5:302021-09-02T05:19:24+5:30
प्रतीक मुधोळकर अहेरी : येथील सुमित सुरेश दोंतुलवार या युवकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ...

अहेरीचा सुमित झळकला टीव्ही मालिकेत
प्रतीक मुधोळकर
अहेरी : येथील सुमित सुरेश दोंतुलवार या युवकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘जय भवानी, जय शिवाजी’ या मालिकेत स्थान मिळविले आहे. त्याने जावळीचे राजे चंद्रराव मोरे यांच्या सरदाराची भूमिका या मालिकेत साकारली. दुर्गम जिल्ह्याच्या सीमावर्ती तालुक्यातील युवकाची ही भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सुमितचे दहावीपर्यंतचे शिक्षण अहेरी येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर गाठले. सध्या तो पुणे येथे एका मोबाइल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. त्याचे वडील सुरेश दोंतुलवार हे जिल्हा परिषद शाळेत उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहे.
सुमितचे मूळ गाव अहेरी तालुक्यातील देवलमारी हे आहे. अहेरीमध्ये त्याचा परिवार स्थायिक झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीसारख्या मागासलेल्या भागातून टीव्ही मालिकेत महत्त्वाची भूमिका मिळणे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
(बॉक्स)
नोकरीसोबत जोपासतोय छंद
विशेष म्हणजे सुमित आपली नोकरी सांभाळून अभिनय करत आहे. त्याने कुठेच अभिनयाचे धडे घेतलेले नाही. पण लहानपणापासून सुमितला अभिनयाची आवडत होती. शाळेतील विविध कार्यक्रमात तो सहभागी होत होता. पुणे येथे नोकरी करताना त्याने आधी नाट्यगृहात अभिनय करणे सुरू केले. त्याने ‘येडा येडा’ नावाचा अल्बमही काढला असून त्याचे गाणे युवा वर्गात लोकप्रिय झाले आहे.
(बॉक्स)
युवकांनी पुढे यावे
‘लोकमत’शी बोलताना सुमित म्हणाला, आपल्या भागातील युवकांमध्ये ही अनेक सुप्त गुण आहेत. मात्र त्यांना योग्य तो प्लॅटफार्म मिळत नाही म्हणून ते मागे राहतात. त्यांनी समोर येऊन आपल्या सुप्त गुणांना जगासमोर आणायला पाहिजे. सुमितने आणखी चार ठिकाणी मालिकेसाठी ऑडिशन दिली असून संधी मिळाल्यास तिथेही सुमित विविध भूमिका साकारणार आहे.
010921\956-img-20210831-wa0021.jpg~010921\fb_img_1630470361475.jpg
सुमित मालिकेत अभिनय करतांना~सरदाराची भूमिका साकारताना सुमित