आठ वर्षानंतर अहेरीत वाहतूक पोलीस
By Admin | Updated: April 11, 2015 01:12 IST2015-04-11T01:12:51+5:302015-04-11T01:12:51+5:30
आठ वर्षांपूर्वी अहेरी, आलापल्ली शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दिमतीला केवळ एक वाहतूक

आठ वर्षानंतर अहेरीत वाहतूक पोलीस
वाहतूक सुरळीत : आठवडाभरात ५० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई
अहेरी : आठ वर्षांपूर्वी अहेरी, आलापल्ली शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या दिमतीला केवळ एक वाहतूक पोलीस देण्यात आले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्याची वर्षभरात बदली झाली. त्यानंतर तब्बल आठ वर्षाने अहेरी पोलीस ठाण्याला दोन वाहतूक पोलीस देण्यात आले असून या वाहतूक पोलिसांनी आठवडाभरात नियम मोडणाऱ्या ५० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई केली. यामुळे या भागातील वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे.
अहेरी राजनगरीत वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. या भागातील अनेक चारचाकी व दुचाकी वाहनधारक आपल्या मनमर्जीने बेधुंदपणे सुसाट वेगाने वाहन चालवितात. याशिवाय काही वाहनचालक वाटेल त्या ठिकाणी आपली वाहने उभी ठेवतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न पुन्हा बिकट होतो. अनियंत्रित वाहतुकीमुळे अहेरी, आलापल्ली व नागेपल्ली या ठिकाणी आजवर अनेक अपघात घडले आहेत. जनतेच्या मागणीचा विचार करून व सदर गंभीर प्रश्नाची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने अहेरी पोलीस ठाण्यांतर्गत आठवडाभरापूर्वी दोन वाहतूक पोलिसाची नियुक्ती केली आहे.
नव्यानेच रुजू झालेले हे दोन्ही वाहतूक पोलीस अहेरी, आलापल्ली, नागेपल्लीच्या वर्दळीच्या ठिकाणी तसेच चौकात दिवसभर वाहतूक नियंत्रित करण्याचे काम करीत आहेत. वाहतूक पोलिसांकडून ट्रिपलसिट, विनापरवाना, अल्पवयीन शालेय दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई सुरू आहे.
सदर वाहतूक पोलीस अहेरी, आलापल्ली भागातून जाणाऱ्या अवजड चारचाकी वाहनाची कसून तपासणी करीत आहेत. (प्रतिनिधी)
अवैध वाहतुकीला आळा बसणार
गेल्या सात वर्षात अहेरी पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक पोलीस कार्यरत नसल्याने या भागात काळीपिवळी टॅक्सी व इतर वाहनांमार्फत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत होती. मात्र आता वाहतूक पोलिसांची नियुक्त झाल्याने या भागातील अवैध वाहतुकीला आळा बसणार आहे. अल्पवयीनांचे वाहन चालविण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.