अहेरी तालुक्याला बसला वादळाचा तडाखा

By Admin | Updated: May 6, 2016 01:14 IST2016-05-06T01:14:01+5:302016-05-06T01:14:01+5:30

बुधवारी सायंकाळी व रात्री वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा अहेरी तालुक्याला बसला.

Aheri taluka bus hit the storm | अहेरी तालुक्याला बसला वादळाचा तडाखा

अहेरी तालुक्याला बसला वादळाचा तडाखा

घरांवरील छत उडाले : गडबामणी गावातील नागरिकांचे सर्वाधिक नुकसान; शासनाकडून मदतीची मागणी
अहेरी : बुधवारी सायंकाळी व रात्री वादळवाऱ्यासह झालेल्या पावसाचा तडाखा अहेरी तालुक्याला बसला. अहेरीसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या घराचे छत कोसळले. गडबामणी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत उडून गेले. रस्त्यांवर झाडे पडल्याने रात्रभर वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर विद्युत तारांवरही झाडे कोसळल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास १ तास वादळ सुरूच होते. त्यानंतर आणखी दोन तासाने जवळपास ९.३० वाजताच्या सुमारास पाऊस व वादळाला सुरुवात झाली. सायंकाळी अचानक सुरू झालेल्या वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना उसंत मिळाली असली तरी या वादळाने नागरिकांचे लाखो रूपयांचे नुकसान केले. काही नागरिकांच्या घरावरील कवेलू उडून नुकसान केले. तर काही नागरिकांच्या घरावरील टिनाचे छतच उडून गेले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गडबामणी येथील नंदू सिडाम यांच्या घरासमोरील छावणी व घरावचे टिन १०० मीटर अंतरावर जाऊन पडले. स्वयंपाक घरचेही नुकसान झाले. गडबामणी येथीलच व्यंकटेश रामटेके यांच्या घराचेही छप्पर उडाले. अहेरी नगर पंचायतीचे स्वच्छता समिती सभापती नारायण सिडाम यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. महसूल विभागाने तत्काळ सर्वे करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. घरावरील छत उडल्याने तो दुरूस्तीसाठी आता हजारो रूपये खर्च येणार आहे. हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न पीडित कुटुंबासमोर निर्माण झाला आहे.

स्पार्र्किं गने चेरपल्लीत लागली आग
चेरपल्ली येथील सुनतकर मोहल्ल्याजवळ शेख यांच्या शेतात मुख्य लाईनच्या वीज तारांचा वादळामुळे स्पर्श होऊन स्पार्र्किं ग झाली. यामुळे नजीकच्या कुंपनाला आग लागली. या आगीने संपूर्ण कुंपन जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी आग विझविली. मेन लाईनच्या वीज तारा अजूनही लोंबकळतच आहेत. त्यामुळे आणखी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर तारा दुरूस्त कराव्या, अशी मागणी पोलीस पाटील आनंदराव सुनतकर, नारायण बोरकुटे, अमोल रामटेके यांनी केली आहे.

गडबामणी शाळेचे छत उडाले
अहेरी येथून तीन किमी अंतरावर असलेल्या गडबामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत वादळाने पूर्णत: उडाले. या शाळेची दुरूस्ती सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. त्यावेळी छतावर प्रोफाईल टिनचे छप्पर बसविण्यात आले होते. शाळा दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र पावसामुळे हा खर्च वाया गेला. सहा महिन्यांतच छत उडाल्याने बांधकामाविषयीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. शाळेची तत्काळ दुरूस्ती न केल्यास पुढील शैक्षणिक सत्रात बसायचे कुठे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होणार आहे. त्यामुळे इमारत तत्काळ दुरूस्तीची मागणी होत आहे.

Web Title: Aheri taluka bus hit the storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.