लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा सुरू होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अहेरी तालुक्यातील अहेरी-महागाव रस्त्यावर असाच एक प्रकार समोर आला आहे. खड्ड्यांमध्ये रस्त्यावरील पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.
या परिसरातील नागरिकांना सदर मार्गावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर अपघात होण्याची गंभीर शक्यता आहे. परंतु या बाबीकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. काही महिन्याअगोदर अहेरी तालुक्यातील महागाव व वांगेपल्ली मार्गावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु होताच या मार्गावर खड्डे पडले आहेत.
उपाययोजनांकडे बांधकाम विभागाचा कानाडोळासदर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिणामी अहेरी-महागाव रस्त्याची अवस्था सध्याच्या परिस्थितीत खूपच वाईट झाली आहे. रस्त्याला तलावाचे स्वरूप आल्याने वाहतूक करणे कठीण झाले आहे. परिसरातील नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
"सदर रस्त्याचे डांबरीकरण काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. तरीही पाऊस सुरू होताच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करतात. त्याचा फटका परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे."- जावेद अली, विदर्भ अध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना.