अहेरी रूग्णालयाची आरोग्य सेवा अस्थिपंजर
By Admin | Updated: August 14, 2016 01:39 IST2016-08-14T01:39:07+5:302016-08-14T01:39:07+5:30
अहेरी उपविभागातील पाच तालुक्याच्या लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार असलेल्या अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून ....

अहेरी रूग्णालयाची आरोग्य सेवा अस्थिपंजर
रूग्णांची हेळसांड : उपजिल्हा रूग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याचा परिणाम
ए. आर. खान अहेरी
अहेरी उपविभागातील पाच तालुक्याच्या लोकसंख्येच्या आरोग्यसेवेचा भार असलेल्या अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने या रूग्णालयाची आरोग्य सेवा पूर्णत: अस्थिपंजर झाली आहे. परिणामी रूग्णांची प्रचंड हेळसांड होत असून औषधोपचारासाठी या भागातील गरीब रूग्णांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे.
राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे अहेरी येथे निवासस्थान आहे. मात्र शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितपणामुळे त्यांच्याच क्षेत्रात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजले आहेत. अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा व अहेरी या पाच तालुक्यातील हजारोच्या संख्येने रूग्ण दररोज अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात औषधोपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयात अद्यापही अतिदक्षता केंद्र सुरू करण्यात आले नाही. या रूग्णालयात सद्य:स्थितीत एक वैद्यकीय अधीक्षक, दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत असून अलिकडेच एका कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या रूग्णालयाला जवळपास १० डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवा प्रचंड प्रभावित होत आहे. मात्र याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे.
गेल्या दोन वर्षापूर्वीपासून आरोग्य उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्यामार्फत आरोग्य सेवा मुख्य संचालक मुंबई, पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हाधिकारी गडचिरोली आदींना वेळोवेळी पत्राद्वारे पाठपुरावा करून येथील रिक्तपदे भरण्याची विनंती करण्यात आली. मात्र पद भरतीची बाब अद्यापही दुर्लक्षितच आहे.
- डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रूग्णालय अहेरी
कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच रक्ततपासणी
अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात गेल्या दोन वर्षापासून प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. येथे रक्त तपासणीचे काम कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरवशावर सुरू आहे. परिणामी वाढत्या रूग्ण संख्येमुळे रक्त तपासणीचा रिपोर्ट रूग्णांना मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे. विशेष म्हणजे या रूग्णालयात रक्तनमुने घेण्यासाठीच्या स्लाईडपट्ट्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सफाई कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर ११ पदांपैकी पाच जागा रिक्त आहे. त्यामुळे रूग्णालय परिसरात स्वच्छतेच्या कामावर परिणाम होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना संपूर्ण रूग्णालयाची सफाई करण्यास अडचण आहे.