अहेरी रुग्णालयात ५० खाटा वाढणार
By Admin | Updated: August 28, 2015 00:16 IST2015-08-28T00:16:41+5:302015-08-28T00:16:41+5:30
नागपूर मंडळाच आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी गुरूवारी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला.

अहेरी रुग्णालयात ५० खाटा वाढणार
उपसंचालकांनी घेतला आढावा : विद्यमान इमारतीवर बांधकाम
अहेरी : नागपूर मंडळाच आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी गुरूवारी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयाची क्षमता दुप्पट करून ५० खाटांची वाढ करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला.
आढावा बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. कुमरे, यूनीसेफचे अधिकारी डॉ. व्ही. डब्ल्यू. भारद्वाज, कार्यकारी अभियंता लोंढे, आर.सी.एच चे अधिकारी शंभरकर, उपअभियंता कोहळे, कनिष्ठ अभियंता सय्यद, शंकर मगडीवार, दिनेश येनगंटीवार, श्रीनिवास चतारे, पंकज नौनुरीवार आदी उपस्थित होते.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी या चार तालुक्यांचा भार अवलंबून आहे. त्यामुळे या रुग्णालयात शेकडो रुग्ण भरती होण्यासाठी येतात. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था आहे. मात्र कधीकधी रुग्ण वाढत असल्याने रुग्णांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन आणखी ५० खाटा वाढविण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. डॉ. कन्ना मडावी यांनी इमारतीवर रुग्णायाचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविणे शक्य होईल. रुग्णालयाचे बांधकाम झाल्यानंतर दंत शल्य चिकित्सक, नेत्र विभाग, एसएनसीयू, आरबीएसके युनिट, ब्लड बँक आदी विभाग वर नेण्यात येतील. गरज पडल्यास इतरही विभागांचे स्थानांतरण केले जाईल.
यावेळी डॉ. जयस्वाल यांनी इमारतीच्या बांधकामाकरिता लागणारे प्रोव्हीजनल स्टेज- १ इस्टिमेट व प्रोव्हीजनल प्लॅन १ आठवड्याच्या आत ३ सप्टेंबरपर्यंत सादर करावे, असे निर्देश दिले.
तसेच रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेली यंत्रसामग्री व नवीन इमारत बांधण्यात आल्यानंतर लागणारी यंत्रसामुग्री यांची यादी देण्यात यावी, असेही निर्देश कनिष्ठ अभियंत्याला दिले. (शहर प्रतिनिधी)