अहेरीला मिळणार हातपंप दुरूस्ती वाहन
By Admin | Updated: May 21, 2015 01:39 IST2015-05-21T01:39:55+5:302015-05-21T01:39:55+5:30
अहेरी तालुक्यासह उपविभागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक गावात हातपंप बंद आहे.

अहेरीला मिळणार हातपंप दुरूस्ती वाहन
गडचिरोली : अहेरी तालुक्यासह उपविभागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक गावात हातपंप बंद आहे. या हातपंपाची दुरूस्ती करण्यासाठी अहेरी पंचायत समितीला हातपंप दुरूस्तीचे अतिरिक्त वाहन देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता सभेला सुरूवात झाली. या सभेत जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर अहेरी पंचायत समितीला एक अतिरिक्त हातपंप दुरूस्ती वाहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते केशरी पाटील उसेंडी यांनी खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. शेतकऱ्यांना बियाणे व खत वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना सभागृहात केली. त्यावर यावेळी नियोजन तयार झालेला आहे. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खत उपलब्ध होतील, अशी माहिती कृषी सभापती अजय कंकडालवार यांनी सभागृहाला दिली. जिल्हा परिषदेचे सदस्य पद्माकर मानकर यांनी शिक्षकांच्या काही संघटना पदाधिकाऱ्यांची बोगस बदली प्रकरणात बदनामी करीत आहे, असा मुद्दा उपस्थित केला. या बदली प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने न्यायालयात जाऊ नये, अशी विनंतीही मानकर यांनी सभागृहाला केली. या चर्चेत आणखी काही सदस्य सहभागी झाले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांनी राजिनामे दिल्यामुळे रिक्त झालेल्या विषय समितीच्या पदांवर नव्या सदस्यांची नियुक्तीही या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. सायंकाळी उशीरापर्यंत ही सभा सुरूच होती. (स्थानिक प्रतिनिधी)