अहेरी शहरात एक कोटींच्या विकास कामांना सुरुवात

By Admin | Updated: September 9, 2015 01:35 IST2015-09-09T01:35:40+5:302015-09-09T01:35:40+5:30

अहेरी शहरासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधीतून अहेरी शहरात रस्ते, नाली बांधकाम व इतर कामे केली जाणार आहेत.

In Aheri, the development works of one crore start | अहेरी शहरात एक कोटींच्या विकास कामांना सुरुवात

अहेरी शहरात एक कोटींच्या विकास कामांना सुरुवात

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ : रस्ते व नालींची सुविधा होणार
अहेरी : अहेरी शहरासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून सदर निधीतून अहेरी शहरात रस्ते, नाली बांधकाम व इतर कामे केली जाणार आहेत. या कामाचा शुभारंभ पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नेत्र तपासणी शिबिरादरम्यान ज्या नागरिकांना चष्मे लागले, अशा नागरिकांना चष्म्यांचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अहेरी शहरातील दानशूर चौक ते तहसील कार्यालय, कोत्तूर रोड, बाजारवाडीतील तीन सिमेंट रस्ते, अहेरी शहरातील काही वॉर्डांमधील नाली बांधकाम केले जाणार आहे. यासाठी एक कोटी रूपयांचा खर्च येणार असून त्याचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अहेरीला संपूर्ण जिल्ह्यात राजनगरी संबोधल्या जाते. त्यामुळे अहेरी शहराचा विकास करून एखाद्या राजाच्या नगराप्रमाणे हे शहर ठेवण्याचे आश्वासन आपण निवडणुकीच्या वेळी दिले होते. नागरिकांना दिलेले आश्वासन आपण पाळणार आहोत. राज्य शासनाकडून यासाठी निधी खेचून आणला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. ज्या कामांचा अहेरीत शुभारंभ करण्यात आला आहे, त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. शहरातील समस्या नागरिकांनी आपल्या लक्षात आणून द्याव्या, अधिकाऱ्यांच्या मार्फतीने पाठपुरावा करून त्या सोडविल्या जातील, असेही आश्वासन दिले.
या कार्यक्रमाला अहेरी येथील नागरिक, भाजपा व नाग विदर्भ आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. येथील कार्यक्रम आटोपून पालकमंत्री मुलचेरा तालुक्याच्या दौऱ्यावर रवाना झाले. (प्रतिनिधी)

Web Title: In Aheri, the development works of one crore start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.