‘श्री’ पद्धतीने धान लागवड करण्यावर कृषी विभागाचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:52 IST2016-06-18T00:52:22+5:302016-06-18T00:52:22+5:30
‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी,

‘श्री’ पद्धतीने धान लागवड करण्यावर कृषी विभागाचा भर
पाच हेक्टरचे उद्दिष्ट : उत्पादनात होते ५५ टक्के वाढ
गडचिरोली : ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड केल्यास उत्पादनात ५५ टक्के वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची श्री पद्धतीनेच लागवड करावी, यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. २०१६ च्या खरीप हंगामात किमान पाच हजार हेक्टरवर ‘श्री’ पद्धतीने लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जिल्हाभरात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी एकट्या धानपिकाचा वाटा सुमारे दीड लाख हेक्टर आहे. शेतकरीवर्ग उत्पादन वाढीसाठी संकरित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत असला तरी धान लागवडीची पद्धत मात्र पारंपरिक आहे. पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड करताना अगदी जवळ लागवड केली जाते व त्यामध्ये रोपांची संख्या अधिक राहते. दाटीने धान लागवड झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड ‘श्री’ पद्धतीने करावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याला निर्देश दिले आहेत.
२०१५-१६ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत धान पिकासाठी प्रकल्प आधारित कार्यक्रम राबविण्यात आला होता. याअंतर्गत प्रत्येक कृषी सेवकाला निर्देश देऊन श्री पद्धतीने धानाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक मोठ्या गावी शिबिर घेऊन ‘श्री’ पद्धतीने धानाच्या लागवडीविषयी प्रसार, प्रचार करण्यात आला. परिणामी मागील वर्षी तीन हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली. यावर्षी पाच हजार पेक्षा अधिक हेक्टरवर श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. यांत्रिकीकरणामध्ये वाढ होत असल्याने श्री पद्धतीने धान लागवडीस प्रोत्साहन मिळत आहे. यावर्षीच्या हंगामात उद्दिष्ट गाठणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)
सिंचनाची सोय नसल्याने वाढली अडचण
श्री पद्धतीने धानाची लागवड करताना प्रत्येक रोपटा एक ते दीड फूट अंतरावर लावला जातो. त्याचबरोबर या पद्धतीने रोवणी करताना धानाची रोवणी अगदी वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात फार कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. पाऊस लांबल्यास रोवणी लांबते. उशिरा रोवणी झाल्यास व श्री पद्धतीने लागवड झाल्यास पारंपरिक पद्धतीपेक्षाही उत्पादनात घट होण्याची शक्यता राहते. त्यामुळे श्री पद्धतीने उत्पादनात वाढ होते, हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असले तरी या पद्धतीने रोवणी करण्यास धजावत नाही.