गावांत पोहोचणार कृषी योजना
By Admin | Updated: June 22, 2015 01:33 IST2015-06-22T01:33:05+5:302015-06-22T01:33:05+5:30
राज्याच्या कृषी विकासाच्या दरात वृद्धी व्हावी, या दृष्टीने केंद्र व राज्यपुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

गावांत पोहोचणार कृषी योजना
गडचिरोली : राज्याच्या कृषी विकासाच्या दरात वृद्धी व्हावी, या दृष्टीने केंद्र व राज्यपुरस्कृत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांना मिळावा व कृषी विषयक योजनांची जनजागृती व्हावी, या हेतूने १ ते ७ जुलै २0१५ पर्यंत कृषी जागृती सप्ताह साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या कृषी विभागाने दिले आहेत. या जागृती सप्ताहात गावागावांत कृषीविषयक योजनांची जनजागृती केली जाणार आहे. कृषी विभागातील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
ग्रामीण भागात कृषी योजनांची माहिती पोहोचत नाही. याकरिता सदर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. कृषी जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाकडील सुधारित तंत्रज्ञान आणि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करायची आहे. कृषी विस्ताराला गती देण्यासाठी कृषी विभागाकडून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाअधिक शेतकऱ्यांना जोडले जात आहे. या सर्व प्रयत्नांना पूरक म्हणून राज्यभरात १ ते ७ जुलैपर्यंत कृषी जागृती सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाच्या कृषी विभागाने घेतला आहे. त्या आशयाचे पत्र जिल्ह्यातील यंत्रणेला पाठविण्यात आले आहे. सदर उपक्रम राबविण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर सूक्ष्म नियोजन करावयाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून कृषी उपक्रमाचे नियोजन करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. कृषी सप्ताहाच्या जनजागृतीसाठी विविध प्रशिक्षण योजनांमधील संकीर्ण बाबीकरिता असलेला निधी आणि आत्मांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीमधून उपलब्ध करून द्यावा. कृषी विभागामार्फत जागृती सप्ताहात शेतकऱ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविल्या जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)