परीक्षेच्या तोंडावर पुन्हा क्रीडा स्पर्धा
By Admin | Updated: February 7, 2015 23:22 IST2015-02-07T23:22:54+5:302015-02-07T23:22:54+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षेच्या तोंडावर पुन्हा क्रीडा स्पर्धा
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्याचे प्रयोजन काय हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना आपले काम सोडून क्रीडा स्पर्धांसाठी हजेरी लावावी लागणार आहे. शिवाय या आयोजनावर चार लाखांवर निधीची उधळपट्टीही केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या हेतुने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनंतर केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय कला व क्रीडा महोत्सव घेण्यात येतात. या संमेलनासाठी जिल्हा परिषदेचा लाखो रूपयाचा निधी खर्च होतो. विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कला विकासाच्या दृष्टीकोणातून अशा प्रकारचे महोत्सव घेणे गरजेचे आहे. मात्र कला व क्रीडा महोत्सव जानेवारी महिन्यापर्यंतच उरकून घ्यायला पाहिजे होते. मात्र जिल्हा परिषद पोट निवडणुकीच्या आचारसंहितेचा बाऊ करून जि.प. शिक्षण विभागाने ११ फेब्रुवारीपासून चार दिवशीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व कला महोत्सव आयोजित केले आहे. या कला व क्रीडा महोत्सवात सहभागी होणारे विद्यार्थी आपल्या शिक्षकांकडून विविध खेळांचे व कला स्पर्धांची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. यामुळे या महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. महिनाभरानंतर शाळांच्या परीक्षा होतात. त्याच्या तोंडावरच हा क्रीडा महोत्सव जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे सोडून या महोत्सवासाठी हजेरी लावावी लागणार आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिल्या जाते. मात्र भविष्यात या प्रमाणपत्राच्या भरवशावर खेळाडू विद्यार्थ्यांना कोणताही लाभ मिळत नाही. या क्रीडा स्पर्धांच्या प्रमाणपत्राला कवडीची किमत नसल्याने या स्पर्धांवर निधीची उधळपट्टी का असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना उगाच क्रीडा संमेलनाच्या नावाखाली वेठीस धरण्याचा हा प्रकार गडचिरोली जिल्हा परिषदेने चालविला आहे. त्यामुळे या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात याव्या, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरवर्षी या स्पर्धांवर होणाऱ्या खर्चातून पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने आयोजनावर सर्वांचाच भर असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)